Breaking News

राष्ट्रीय मैदानी कुस्ती स्पर्धेत कामट्यास सुवर्णपदक


सातारा,  (प्रतिनिधी) : शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या आणि शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेल्या पारधी समाजातील कामट्या उर्फ कल्याणने राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करताना फत्त्यापूर (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी त्याची जीपमधून भव्य मिरवणूक काढली. पालातील युवकाच्या यशाबद्दल फत्त्यापूर ग्रामस्थांनी त्याची जीपमधून मिरवणूक काढल्याने ग्रामस्थांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

कामट्या उर्फ कल्याण लक्ष्मण पवार हा सातारा तालुक्यातील फत्त्यापूरचा आणि गावकुसाबाहेरील पालामध्ये राहाणार्‍या पारधी समाजातील. पोटापाण्यासाठी आई-वडिलांची सततची भटकंती. तो जात्याच अत्यंत काटक, चपळ. इयत्तग पहिलीत असतानाच त्याच्यातील हे नैसर्गिक गुण त्याचे शिक्षक युवराज कणसे यांनी ओळखले. त्यांनी कामट्यावर लक्ष केंद्रित केले. त्याला आपल्यासोबत घरी आणले. कणसे यांच्या पत्नी संगीता याही प्राथमिक शिक्षिका. या कुटुंबाने कामट्याला आपल्याच घरातील घटक मानले व त्याच्यावर पुत्रवत प्रेम केले.

त्याची जिद्द अन् प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे कामट्याची सहा वर्षांपूर्वी शासनाच्या क्रीडाप्रबोधिनी उपक्रमात निवड झाली. सध्या तो कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेतो. त्याच्या शिक्षण, खेळाच्या खर्चाचा भार सध्या शासनातर्फे उचलला जातो. कुस्तीत त्याने प्रावीण्य संपादन केले आहे. वर्धा येथे नुकत्याच आयोजित राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात त्याने सुवर्णपदक पटकाविले. त्याबद्दल फत्त्यापूर येथील ग्रामस्थांनी त्याचा व श्री. कणसे यांचा सत्कार आयोजिला. त्याच्यासह वैष्णवी कणसे, सिद्धी कणसे, वैभव शेडगे, आश्‍विन भुजबळ, स्वयंम कणसे, प्रतीक कणसे या यशस्वी खेळाडूंचीही जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अंगापूर, फत्त्यापूर परिसरातील शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामट्याच्या ’कल्याण’ची गोष्ट!

आरंभीच्या काळात कामट्या या नावाला सारेच हसत. त्याचे कामट्यालाही वाईट वाटत असे. मात्र त्यावर मार्ग शोधताना तत्कालीन गट शिक्षणाधिकारी मंगल सोनावले यांनी त्याचे कल्याण असे नामकरण केले. क्रीडाप्रबोधिनीत उज्ज्वल कामगिरी करुन त्याने आपले नाव सार्थ केले.