मुस्लिमांशी दंगल घडवण्याचा कट



लखनऊः बुलंदशहरमध्ये गोहत्येवरून झालेला हिंसाचार हा मोठ्या कटाचा भाग होता आणि मुस्लिमांशी दंगा घडवण्याचा तो एक प्रयत्न होता, असे तपासात समोर आले आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक एस.बी. शिरोडकर यांनी केलेल्या चौकशी अहवालात अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश पडला आहे. हा अहवाल उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना सादर करण्यात आला असून तो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात येणार आहे.

हा हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग होता, हे सिद्ध करणारा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे गायीचा सांगाडा हा 48 तास जुना होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा सांगाडा सगळ्या हिंसाचाराचे मूळ होता, ज्यात एका पोलिस अधिकार्‍याला व एका तरुणाला प्राण गमवावे लागले. बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख योगेश राज यांनी गोहत्या सयाना गावात झाल्याचे सांगितले असले, तरी तशी शक्यता कमी असल्याचे नमूद करताना हा सांगाडा तब्बल 48 तास जुना होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. योगेश राज यांनी आपण गोहत्या होताना बघितल्याचा जबाब दिला होता. जमावाचे वागणेही हे सूचित करत होते, की काहीजण परिस्थिती चिघळावी व हिंसाचार व्हावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

योगेश राजच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवल्यानंतरही जमावाने रास्ता रोको मागे घेतला नाही. गुन्हा नोंदवल्याचे पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांनी सांगितल्यानंतर काही जण ट्रॅक्टर घेऊन लांब गेले; परंतु गायीचे अवशेष असलेली ट्रॉली रस्त्याच्या मधोमध ठेवून जमावाने रस्ता अडवून ठेवला. सुबोधकुमार व तहसीलदार या दोघांच्याही लक्षात आले, की अवघ्या 30 किलोमीटरवरून येत असलेल्या मुस्लिमांच्या मिरवणुकीशी भिडावे, या उद्देशानेच प्रकरण चिघळवण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांनी ती ट्रॉली हटवण्याचा प्रयत्न केला आणि जमावाने विरोध करत हिंसाचार केला, ज्यामध्ये दोघांचे प्राण गेले. शिरोडकर यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले असून पोलिसांना या कटाची पूर्वकल्पना कशी आली नाही, असा सवाल विचारला आहे. पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाला या कटाची कल्पना असायला हवी होती, असे ताशेरे या अहवालात ओढण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळी पुरेसा फौजफाटा वेळीच पाठवला नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget