Breaking News

सातार्‍यात सोमवारपासून ग्रंथ प्रदर्शन
सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने सोमवार दि. 10 व मंगळवार दि. 11 रोजी ग्रंथ प्रदर्शन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे सदस्य विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.

ग्रंथ प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना सोनावणे यांनी सांगितले की, सोमवार दि. 10 रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन जिल्हा परिषद कार्यालय ते अजिंक्य कॉलनीपयर्र्त करण्यात आले असून नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 10.30 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे भूषवणार आहेत. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी 4.30 वाजता समृद्ध जगण्यासाठी वाचन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून डॉ. राजेंद्र कुंभार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत

मंगळवार दि. 11 डिसेंबर रोजी 10.30 वाजता कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता कवी संमेलन होणार आहे. ग्रंथोत्सवाचा समारोप सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, डॉ. प्रभाकर पवार, पुण्याचे सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ग्रंथमहोत्सवानिमित्त विविध ग्रंथ विक्रीचे स्टॉल्सही उभारण्यात येणार असून याठिकाणी शासकीय योजनेतील अनेक ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असल्याची माहिती सोनावणे यांनी यावेळी दिली. या ग्रंथमहोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.