Breaking News

वीज कर्मचार्‍यांचे मंगळवारी काळ्या फिती लावून काम


वडूज (प्रतिनिधी) : वीज कंपनीच्या चारही शाखांतील कर्मचारी मंगळवार दि. 1 जानेवारी रोजी काळ्या फिती लावून व सोमवार दि. 7 रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप करणार असल्याची माहिती विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील गडकरी यांनी दिली. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, इलेक्ट्रीक वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन, वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कामगार काँग्रेस (इंटक) या संघटनांनी हा आंदोलनाचा नारा दिला आहे. 

वीज कंपनीकडे प्रलंबीत असणार्‍या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. उर्जामंत्री व कंपनी व्यवस्थापनामध्ये चर्चेच्या काही फेर्‍या देखील झाल्या, मात्र प्रश्‍न मार्गी लागले नाहीत. कर्मचारी संघटनांच्या संंयुक्त कृती समितीच्या बैठकीत वीज कंपनी व सरकारच्या नकारात्मक भूमिकेवर नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे वीज कंपनीच्या चारही शाखांतील कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी मंगळवार दि. 1 रोजी काळ्या फिती लावून व सोमवार दि. 7 रोजी एक दिवशीय लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, दि. एक जानेवारीला कर्मचारी आपापल्या कार्यालयाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तसेच सोमवार दि. 7 रोजी जिल्ह्यातील सर्व विभागीय व मंडल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या संपात जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.