Breaking News

कुंभमेळ्यासाठी रेल्वेकडून आठशे विशेष ट्रेन


लखनऊः उत्तर प्रदेशात 2019 मध्ये होणार्‍या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासन 800 विशेष ट्रेन चालवणार आहे. देशातील विविध स्थानकांपासून ते प्रयागराजपर्यंत या विशेष ट्रेन धावणार असल्याचे रेल्वेच्या एका अधिकार्‍याने सांगितले. 

कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांची आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये, म्हणून देशातील प्रत्येक झोनमधून सहा विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. 5 हजार प्रवाशांना प्रयागराजवरून दिल्लीला नेण्यासाठी पाच स्पेशल ट्रेन चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. वाराणासीत प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर हे प्रवासी भारतीय कुंभमेळ्याला जाणार आहेत. त्यानंतर नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही ते भाग घेतील. या स्पेशल ट्रेनमध्ये 1400 कोच असतील. शिवाय एनसीआर झोनमधून चालवण्यात येणार्‍या या स्पेशल ट्रेनवर व्हिनाइलचे पोस्टर लावून कुंभमेळ्याची ब्रँडिंग केली जाणार आहे. रेल्वेच्या या कोचमध्ये कुंभमेळ्याचे रंगीत आणि आकर्षक फोटो लावण्यात येतील. प्रयागराजमधील प्रसिद्ध इमारतींचे फोटोही कोचमध्ये  लावण्यात येणार आहेत. या आधीच रेल्वेने ’पेंट माय सिटी’च्या माध्यमातून कुंभमेळ्याची ब्रँडिंग केली आहे. अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर 10 हजार प्रवासी राहतील, अशी चार मोठे विश्रांतीगृहेही बांधली आहेत. कुंभमेळ्याला येणार्‍या प्रत्येकावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.