Breaking News

वाहनचालकास बेदम मारहाणशिरूर, (प्रतिनिधी)- उसने घेतलेल्या रकमेचे व्याज देण्यास असमर्थता दर्शविल्याने एका वाहनचालकास दहा जणांनी तलवारीचा धाक दाखवत लाकडी दंडुक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शिरूर तालुक्यातील राक्षसभुवन येथे घडली. या मारहाणीत वाहनचालक जबर जखमी झाला असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

साजिद अमीन पठाण (वय २५, रा. राक्षसभुवन) असे त्या जखमी चालकाचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी साजिदने खोकरमोह येथील संभाजी मिसाळ याच्याकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. मागील महिन्यात त्याने ही रक्कम संभाजीला परत केली. तेंव्हा संभाजीने त्याला व्याज मागितले असता साजिदने नंतर पाहू असे म्हणाला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजता साजिद गावातील एका हॉटेलमध्ये बसला असताना संभाजी मिसाळ, किरण मिसाळ, सिद्धार्थ सखाराम ईनकर (रा. खोकरमोह) व अन्य सात जणांनी दोन जीप आणि मोटारसायकलवरून तिथे येत साजिदकडे व्याजाची मागणी केली. साजिदने व्याज देण्यास असमर्थता दर्शविताच संभाजी मिसाळ याने तलवार काढली आणि अन्य लोकांनी साजिदला लाकडी दंडुक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत साजिद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी साजिदच्या फिर्यादीनुसार दहा जणांवर शिरूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.