Breaking News

शेतकर्‍यांचे कर्ज माफ होईपर्यंत मोदींना झोपू देणार नाही; काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांचा इशारा


नवी दिल्ली : मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील नवनीर्वाचित काँग्रेस सरकारांनी, शेतकर्‍यांची कर्जमाफी केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ’पाहिलं ना तुम्ही काम सुरू झाले’, अशा शब्दात त्यांनी भाजपला चिमटा घेतला. तसेच देशभरातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ होईस्तोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोपू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ते संसद परिसरात पत्रकारांच्या प्रशांना उत्तरे देत होते. पंतप्रधान मोदी यांनी आत्तापर्यंत शेतकर्‍यांचा एक रुपयाही माफ केलेला नाही. शेतकर्‍यांची कर्जमाफी होईपर्यंत त्यांना आम्ही झोपू देणार नाही. आम्ही सर्व भाजपविरोधी पक्ष कर्ज माफ करण्याची मागणी करतो, असेही त्यांनी बोलताना कडक आवाजात बजावले. 

संयुक्त संसद समिती, राफेल प्रकरण, शेतकर्‍यांची कर्जमाफी, नोटाबंदी आणि टाईपिंगच्या त्रुट्या यांच्यावर जनता लवकरच प्रश्‍न विचारणार आहे. लोकांसोबत खोटे बोलण्यात आले. शेतकरी आणि छोट्या उद्योगपतींना  लुटण्यात आले आहे. तर नोटाबंदी हा जगातील सर्वोत मोठा घोटाळा आहे, असे टीकास्त्रही राहुल गांधी यांनी यावेळी भाजपवर सोडले.