Breaking News

कृतीशील शिक्षणाच्या माध्यमातूनच सक्षम विद्यार्थी तयार होतील - विनायक देशमुखनगर । प्रतिनिधी -
पुस्तकी ज्ञानाबरोबर कृतीशील शिक्षणाची जोड दिल्यास सक्षम विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास इंड्स वर्ल्ड स्कूलचे संचालक विनायक देशमुख यांनी व्यक्त केला.

कृतीशील शिक्षण या संकल्पनेंतर्गत इंड्स वर्ल्ड स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्यादृष्टीने प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांना साधे-सोपे प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत आज सायकलचे पंक्चर काढण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रामुख्याने स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे, कपड्यांना इस्त्री करणे, चप्पल-बूट पॉलिश करणे, कपट्यांची बटणे लावणे, रेल्वेचे तिकिट बुकिंग करणे, बँकेचे व्यवहार करणे, शाळेच्या प्रांगणात भाजी-पाला लावणे व त्याची मशागत करणे अशा बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वयंपूर्ण होण्यास व त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

यावेळी देशमुख म्हणाले की, पाश्चत्य शिक्षण पद्धतीमध्ये कृतीशील शिक्षणावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी स्वयंपूर्ण होऊन तेथे बेरोजगारीचे प्रमाण अल्प आहे. तुलनेने आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञानावर अतिभर दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमांबद्दल लाज वाटते. ही संस्कृती बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची सर्व कामे स्वतः करता यावीत. त्यासाठी दुसर्‍या कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी इंड्स वर्ल्ड स्कूलमध्ये लक्ष्य दिले जाते. आज सायकल दुरुस्तीबाबत बाबासाहेब गाडगे यांनी प्रशिक्षण दिले.