Breaking News

मारकुट्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत


सातारा, (प्रतिनिधी)-
दैनिक प्रभातचे भुईंजचे वार्ताहर समीर मेंगळे यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद गुरुवारी जिल्हाभर उमटले. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी सखोल चौकशी करून कारवाईचे संकेत दिले आहेत. वाई पोलिसांच्या दांडगाईचा सातारा जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तालुका पत्रकार संघाकडून निषेध करण्यात आला. वाई तालुका पत्रकार संघाने गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांना निवेदन सादर करून मेंगळे यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध केला.

 मेंगळे हा दि. 3 डिसेंबर रोजी वाई बसस्थानकात वार्ताकंन करत असताना वाई पोलीस ठाण्याचे स.पो.नि बबन येडवे व त्यांच्या सहकार्यांनी मेंगळे यांना घटनास्थळी अपशब्द वापरले. दमदाटी करून त्यांना पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केली. त्यांना धमकी देऊन मोबाईल सुद्धा काढून घेतला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा वाई तालुका पत्रकार संघ तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा पत्रकारांनी यावेळी दिला. 

यावेळी दैनिक प्रभातचे ब्युरो चिफ जयंत काटे, निवासी संपादक मुकुंद फडके, व प्रतिनिधी प्रशांत जाधव,गुरूनाथ जाधव यांच्यासह वाई तालुका पत्रकार संघाचे जयवंत पिसाळ, महेंद्र गायकवाड, भद्रेश भाटे, यशवंत कारंडे, धनंजय घोडके , सुशिलकुमार कांबळे, संजीव वरे, पांडुरंग भिलारे, निलेश जायगुडे, अशोक येवले, दौलतराव पिसाळ, शिवाजीराव जगताप, बाळासाहेब सणस, अनिल काटे, अमोल भंडारी ,पुरषोत्तम डेरे इ . पत्रकार उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी अजित टिके यांनी घडलेल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त करत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

 या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष एस. एम. देशमुख,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांना दिल्या आहेत.