Breaking News

बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी गोवर रुबेला लस आवश्यक : श्‍वेता महाले


  चिखली,(प्रतिनिधी) : देशाच्या प्रगतीसाठी येणारी पिढी आरोग्य संपन्न असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी आतापासूनच बालकांचे आरोग्य सुदृढ बनवणे गरजेचे आहे. ही गोष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील पालकांनी आपल्या मुलांना गोवर रुबेला लस टोचून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले पाटील यांनी केले. बुधवार, 5 डिसेंबर रोजी श्रीमती महाले यांच्या हस्ते धामणगाव येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची सुरुवात करण्यात आली, या प्रसंगी त्या बोलत होत्या.               
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही फक्त महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आरोग्य खात्याची मोहीम नसून ही जागतिक आरोग्य संघटनेची जागतिक मोहीम आहे. 60 च्या दशकात अमेरिका व युरोपने अशीच मोहीम राबवून गोवर रुबेला निर्मुलन केले होते. परंतु, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशिया देशातून हे व्हायरस अजूनही हद्दपार झालेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने 2020 पर्यंत या देशांमध्ये देशव्यापी लसीकरण मोहिमांचा संकल्प केला असून त्या अंतर्गत भारतात देशभर ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे.  गोवर रुबेला लसीकरण मोहीमेबाबत पालक आणि नागरिकांमध्ये असलेल्या अनेक शंका कुशंकांचे निरसन केले.

ज्यांचा अनेक कारणांनी, विविध पॅथी किंवा धार्मिक-जातीय समज-गैरसमज म्हणून या लसीकरणालाच विरोध आहे त्यांनी हे समजून घ्यावं की हे आजार संसर्गजन्य आजार आहेत. तुमची प्रकृती चांगली असली तरीही इतर बाधित व्यक्तीकडून इतरांना हा आजार होऊ शकतो. देशातून नव्हे तर जगातून हे व्हायरस हद्दपार करण्यासाठी ही मोहीम आहे. त्यामुळे त्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या.

आवश्यकता वाटल्यास पालकांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा यासंदर्भात सल्ला किंवा समुपदेशन घ्यावे असे त्या म्हणाल्या.  या प्रसंगी पंचायत समिती सदस्य संदीप उगले, भाजपा जिल्हा सचिव योगेश राजपूत,देवेंद्र पायघन, तेजराव पाटील, देवराव कापरे, पोलीस पाटील ज्ञानेश्‍वर गुळवे, नंदकिशोर देशमुख, मधुकर सपकाळ, नारायण पाटील धंदर, संजय जाधव, गजानन सपकाळ, कृष्णा सिनकर, जगदिश सुरडकर, राजेंद्र अपार यांच्यासह धामणगाव  येथील माता पालक व नागरीक उपस्थित होते.