Breaking News

आगाशिवनगरमधून चोरीच्या दुचाकीसह एकजण ताब्यात


कराड (प्रतिनिधी) : पैसे चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एकाने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मित्राने कोल्हापूरातून चोरून आणल्याचे उघडकीस आल्याने सागर उत्तम लाखे (रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर-मलकापूर, ता. कराड) यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोळे (ता. कराड) येथील दादा तानाजी शिंदे यांच्या घरात घुसून पॅन्टच्या खिशातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओंकार दीपक सातपुते (वय 18, रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर) यास अटक केली होती. तेव्हा त्यांच्याकडे असणार्‍या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी गाडी सागर लाखे या मित्रांची असल्याचे संशयिताने सांगितले. तसेच मोटरसायकल चोरीची असल्याचा संशय बळावल्याने ओंकार सातपुतेचा मित्र सागर लाखे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता कोल्हापूरातील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी चोरल्याची तसेच गाडीचा रंग आणि नंबरप्लेट बदलल्याची कबुली त्याने दिली. गाडी मालक प्रदीप प्रतिक भोसले (रा. शिरोली टोलनाका) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद नोंद होती. त्यानुसार संशयीत आणि त्याच्याकडून जप्त केलेली दुचाकी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. तालुका पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि चंद्रकांत माळी, अमित पवार, शशिकांत काळे, सज्जन जगताप, शशिकांत घाडगे, विजय म्हेत्रे यांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.