Breaking News

बाबासाहेबांच्या संविधानामुळेच भारताचे नाव जगात उंचावले : अ‍ॅड.राठोड


बुलडाणा,(प्रतिनिधी): डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधाना मुळे भारताचे नाव जगात उंचावले असून भारत देश एकसंघ व प्रगती पथावर आहे. आज संविधानाला 68 वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत घटनेने भारतातील विविध घटनाक्रमाला यशस्वीपणे सामोरे जात देशामध्ये गुण्यागोविंदाने लोकशाही नांदत आहे, याचे सर्व श्रेय संविधानाला आहे, त्यामुळेच संविधान भारत देशाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड.संजय राठोड यांनी केले. एन. एस.यु. आयच्या वतीने स्व. देवरावजी नागरे कनिष्ठ महाविद्यालयात संविधान सन्मान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी इंटक नेते लक्ष्मणदादा घुमरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य केले आणि आपल्या देशाचे नाव जगात उंचावण्याचे महत्त्वाचे कार्य केले. दलित, पददलित, महिला, इतर मागासवर्गीय,गरीब यांना समानतेचा अधिकार देऊन त्यांना आपल्यात सामावून घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा मीनल आंबेकर यांनी महिलांना समानतेचा अधिकार देऊन त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानात अधिकार दिले. त्यामुळेच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशात सर्वत्र कार्य करताना दिसत आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक तथा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर यांनी प्रास्ताविकातून आपले विचार व्यक्त केले. जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संध्या इंगळे यांनी संविधानाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंजल्या आणि गांजल्यांचा दिन दाता होता रे, हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी स्व. देवरावजी नागरे यांना आदर्शवत प्राचार्य म्हणून जिल्हा एन. एस. यु. आय. तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईवर जो हल्ला चढवला, त्यात शहीद झालेल्या जवानांना व पोलिसांना एनएसयुआयच्या वतीने आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचालन साक्षी राजगुरे हिने तर आभार प्रदर्शन शिवशंकर बाहेकर यांनी केले. कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुक्त्यारसिंग राजपूत, राजीव कटिकर, चित्रांगण खंदारे, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा नंदिनी टारपे, संध्या इंगळे, तुळशीराम नाईक, विकास जायभाये, श्रीभाऊ ढगे, अ‍ॅड. विशाल गवई, गौतम मोरे, शिवशंकर बाहेकर, बाळा मोरे, अक्षय वनारे, अमोल राठोड, इरफानभाई, विशाल जाधव, संदीप मिसाळ, गणेश जाधव, अल्ताफ भाई, किरण मखरे, शिवानी जाधव, पूनम इंगळे, साक्षी राजगुरू, सिद्धार्थ कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवतींची उपस्थिती होती.