Breaking News

पिग्मी एजंट लूटप्रकरणी दोघे पोलिसांच्या जाळ्यात; रॉयल कारभार ग्रुपच्या सौरभ जाधवसह दोघे ताब्यात


वडूज (प्रतिनिधी) : येथून जवळच उंबर्डे गावच्या हद्दीतील भावलिंग डोंगराजवळ अज्ञात तीन जणांनी मोटारसायकलवरून येऊन एका पिग्मी एजंटला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून 2 लाख 15 हजार रोख रक्कम सह 9 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लुटून नेल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी या घटनेची पाळेमुळे शोधून रॉयल कारभार ग्रुपचा अध्यक्ष सौरभ सुनील जाधव (रा. गुरसाळे, ता. खटाव) व अक्षय उत्तम मोहिते (रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना अटक केली आहे. 

याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, गणेशवाडीतील रमेश भिकू शिंगाडे हे एका बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात. ते पिग्मी गोळा केलेले पैसे घेऊन दोन महिन्यापूर्वी रात्री 9 च्या सुमारास पुसेसावळीहून वडूजकडे येत होते. त्यावेळी त्यांना अज्ञात तीन युवकांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून लुटले होते. दरम्यान गोपनीय महितीच्या आधारे या घटनेचा सखोल तपास करत वडूज पोलिसांकडून रॉयल कारभार ग्रुपचा अध्यक्ष सौरभ सुनील जाधव (रा. गुरसाळे) यास अटक करण्यात आले. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील जोंधळखिंडी येथील अक्षय उत्तम मोहिते यालाही ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी गुन्ह्यातील मिळालेली रक्कम वाटून घेतली असून दोन मोबाईलपैकी एक फेकून दिला तर दुसरा मोबाईल रस्त्यावर आपटून फोडला असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून इतर अज्ञात तीन आरोपी हे सांगली जिल्ह्यातील असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या तपासात पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर, श्री. हांगे, श्री. साळुंखे, श्री. भिलारे यांनी सहभाग घेतला. या दोघांवर पोलिसांनी भादंवि 395 कलमानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दोघांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.