Breaking News

सोनिया, राहुल कसे वाचतात तेच बघतो मोदी यांचा इशारा; नॅशनल हेरॉल्ड व ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी कोंडीचा प्रयत्न


नवीदिल्ली/जयपूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजस्थानमधील सुमेरपूर येथे जाहीर सभा घेतली. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर मोदी, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयात जिंकलोय. केंद्र सरकारला त्यांच्या (सोनिया गांधी व राहुल गांधी) प्राप्तिकराचे पुनर्मूल्यांकन करण्याचा अधिकार असून आता कसे वाचाल ते बघतोच’, असा थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारात अमित शाह यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.
 
मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. ‘हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलालाला दुबईवरून भारतात आणण्यात यश आले. आता बड्या लोकांचे बिंग फुटणार, ही गोष्ट कुठवर जाईल काहीच माहित नाही’, असे सूचक विधानही त्यांनी केले. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नाडिस यांच्या 2011-12 या वर्षांतील प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. या पार्श्‍वभूमीवर मोदींनी हे विधान केले आहे. इटलीतील कंपनी ऑगस्टा वेस्टलँडबरोबर व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारात झालेल्या घोटाळ्यातील दलाल ख्रश्‍चियन मिशेलला बुधवारी पटियाला हाऊस न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. भारतीय तपास यंत्रणांकडून अनेक दिवसांपासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते. या प्रकरणी अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. चौकशीत मिशेलकडून अनेक मोठ्या अधिकार्‍यांची नावे समोर येऊ शकतात. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मिशेलने भारतीय राजकारणी आणि अधिकार्‍यांना लाच दिल्याचा आरोप आहे. 12 हेलिकॉप्टरच्या करार आपल्या बाजूने व्हावा, यासाठी केलेल्या व्यवहाराच्या नावावर ही लाच देण्यात आली होती, असे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले होते. 

ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिश्‍चिअन मिशेलचे प्रत्यार्पण केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलालाला कायद्याच्या कक्षेत आणणे चुकीचे आहे का, विरोधी पक्ष त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल त्यांनी केला.