Breaking News

भ्रष्ट उमेदवारांना धुळ चारुन, चांगले नगरसेवक निवडून येण्यासाठी स्वयंसेवी संघटना शहरात करणार नगरी गुट्टलबाजीचा प्रयोग
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुन्हेगारी पार्श्‍वभुमी, गुंठा मंत्री, वोट माफिया व निष्क्रीय उमेदवारांना या महापालिका निवडणुकीत धुळ चारुन चारित्र्यसंपन्न तसेच सर्वसामान्यांची कामे करणार्‍या लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने नगरी गुट्टलबाजी पॅटर्न शहरात राबविण्यात येत असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

या महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्‍वभुमी असलेले, गुंठा मंत्री, वोट माफिया व निष्क्रीय उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून कोट्यावधी रुपये खर्च करण्याच्या तयारीने उतरले आहेत. मत खरेदी-विक्रीतून निवडून येत असल्याची त्यांची भ्रामक संकल्पना मोडित काढण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन या स्वयंसेवी संघटनांनी नगरी गुट्टलबाजी पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी घरोघरी प्रचार चालू असून, या निवडणुकीत चांगले उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महापालिका निवडणुकित निवडून येण्यासाठी वोट खरेदीसाठी अनेक उमेदवार तयारीत आहे. असे उमेदवार लोकशाहीला लागलेली कीड असून, ते निवडून आल्यास प्रभागाचा व शहराचा विकास होत नाही. तर ते वैयक्तिक स्वार्थ साधून सत्तेच्या माध्यमातून पैसा मिळवतात. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांना स्वारस्य नसते. मत खरेदी करणार्‍या उमेदवारांचा दिवाळा काढून, चांगले उमेदवार निवडून देण्याची संकल्पना नगरी गुट्टलबाजी पॅटर्न मध्ये आहे. यासाठी घरोघरी प्रचार सुरु झाला असून, याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी म्हंटले आहे. यासाठी अ‍ॅड.गवळी, जयाजी सुर्यवंशी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, शशीकांत चंगेडे, रफिक मुन्शी, प्रकाश थोरात, ज्ञानदेव काळे, हिराबाई ग्यानप्पा आदि प्रयत्नशील आहे.