Breaking News

पालकमंत्र्यांच्या दबावाखाली प्रशासकीय अधिकारीसातारा, 
 तामकणे (ता. पाटण) येथील पिण्याच्या पाणी योजनेला चुकीची मान्यता देण्यात आली. यावर पाहणी न करता केवळ पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या दबावाखाली प्रशासकीय अधिकारी काम करत आहे. कायद्याचा धाक दाखवून दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप श्रमिक मुक्ती दलाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 दिवसापासून नाथाची पाग येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. यावर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी बुधवारी त्यांच्या दालनात अधिकारी व श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. यात संबंधित योजनेची तांत्रिक मान्यता चुकीची आहे असे निदर्शनास आणून देत केरा नदीवरून पाणी आणावे असे सांगितले. 

मात्र, यावेळी याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले. तर सदर योजना हि पालकमंत्र्यांनी सुरु करण्याचे आदेश दिले असून ते आदेश पाळले जातील असे ठामपणे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी दोन आठवड्यानंतर नियोजन बैठक आहे, यावेळी बैठक लावून तोडगा आढला जाईल असे सांगण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, अ‍ॅड. व्यासदेव शेळके, जयराम शेळके, चैतन्य दळवी, कृष्णात शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.