Breaking News

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या


महाबळेश्‍वर , (प्रतिनिधी) : येथील मुख्य सुभाष चौकातील महादेव मंदिर परिसरातील कोयना लॉजिंगमध्ये पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथम पतीने पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरला व त्यानंतर स्वतःवर वार करून घेत आत्महत्या केली. हा संपूर्ण प्रकार दहा वर्षांच्या मुलासमोर घडला असल्याने तो घाबरून भेदरलेला होता. या लहान वयात आई वडिलांचे छत्र त्याच्या डोक्यावरून हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, अनिल सुभाष शिंदे (वय 34) व पत्नी सिमा अनिल शिंदे (वय 30) दोघे (रा. वडार सोसायटी ऑफिसजवळ, धानोरी रोड विश्रांतवाडी, पुणे) हे दाम्पत्य आपल्या दहा वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासोबत महाबळेश्‍वर येथे पर्यटनास आले होते. ते मुख्य सुभाष चौकातील महादेव मंदिर परिसरातील कोयना लॉजिंगमध्ये दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान मुक्कामास थांबले होते. महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेमध्ये थोडे फिरल्यानंतर सायंकाळी ते आपल्या रूममध्ये परतले होते.

मात्र बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रूम खालीच राहणार्‍या लॉजिंग मालकास रूममधून विव्हळल्याचा आवाज आला. त्यांनी रूमच्या दिशेने धाव घेतली असता, रूम आतून बंद असल्याचे आढळले. यावेळी दरवाजा ठोटावला असता, लहान मुलाने आतून रूम उघडली. रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पती पत्नीचे मृतदेह दिसले. तात्काळ लॉजिंग मालकाने पोलीस प्रशासन व 108 अम्ब्युलन्सला फोन वरून याची माहिती दिली. तर या दोघाना तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले असता उपचारांआधीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. याप्रकरणी सातारा येथून फॉरेन्सिक टीम व ठसे तज्ज्ञ यांना बोलविण्यात आले होते. तसेच घटनेची माहिती मिळताच स्थानिक सहा पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, सहाय्यक फौजदार अशोक काशीद, श्रीकांत कांबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेची माहिती शहरात समजताच खळबळ उडाली आहे.