Breaking News

जिल्हा न्यायालयात विधी सेवा योजनेच्या माहितीच्या स्क्रीनचे उद्घाटनसातारा, 
सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचे ज्ञान व्हावे आणि योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा न्यायालयात स्क्रीन लावण्यात आली आहे. या स्क्रीनचे उद्घाटन विधी प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए. एस. जे. खान यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्र. अ. कुंभोजकर, न्यायीक अधिकारी, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अंकुशराव जाधव, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी, विधीज्ञ, प्रबंधक, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रत्येक न्यायालयात दर्शनी कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्हा न्यायालय, सातारा येथे दर्शनी कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयात पूर्णवेळ एक विधीज्ञ आणि दोन विधी स्वयंसेवक कार्यरत आहेत. पक्षकार या कार्यालयातून निधी सेवेबाबत माहिती घेवू शकतात. पात्र पक्षकारांना मोफत विधी सेवा मिळण्याबाबत सहकार्य केले जाते.

8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये थकीत दूरध्वनी देयके, घरपट्टी, पाणी पट्टी, वादपूर्व प्रकरणे, प्रलंबीत दिवाणी दावे, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात दावे, बँक दावे, वैवाहीक वाद इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येणार असून पक्षकारांनी 8 डिसेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए. एस. जे. खान यांनी यावेळी केले.