Breaking News

अंबाजोगाईत लॉजिंगच्या आडून चालणार्‍या कुंटणखान्यावर छापा


अंबाजोगाई : येथील साठे चौकातील न्यू संतोष लॉजवर बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली. तर, लॉजमालक असलेला सेवानिवृत्त नायब तहसीलदार, आंटी, लॉजचा व्यवस्थापक आणि तीन ग्राहकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. अंबाजोगाई येथील अण्णाभाऊ साठे चौकात सेवानिवृत्त नायब तहसीलदार आश्रुबा भाऊराव सारूक यांच्या मालकीचा न्यू संतोष लॉज आहे. 


या ठिकाणी लॉजमालक सारूक, लॉज व्यवस्थापक दत्तात्रय रामभाऊ मुंडे आणि आंटी अनिता रमेश जगताप हे तिघेजण संगनमताने महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पथकातील पोलिसांनी शुक्रवारी अंबाजोगाई गाठून दुपारी २.३० वाजता लॉज परिसरात सापळा रचला आणि खबरीला लॉजमध्ये पाठविले. खबरीने आत जाऊन इशारा करताच परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लॉजवर छापा मारला. पोलीसांची चाहूल लागताच लॉज मालक आश्रुबा सारूक पसार झाला. पोलिसांनी लॉजची झडती घेतली असता वेगवेगळ्या तीन खोल्यातून हनुमान मदनराव सोनवणे (वय २८, रा. लोणी, ता. परळी), सिद्धेश्वर जालिंदर पाडुळे (वय २४, रा. दगडवाडी, ता. अंबाजोगाई) आणि फिरोज मुसा दंडीये (रा. बर्दापूर, ता. अंबाजोगाई) या तीन ग्राहकांना तीन महिलांसोबत रंगेहाथ पकडले. पिडीत महिलांची सुटका करत पोलिसांनी तिन्ही ग्राहक आणि लॉज व्यवस्थापक दत्तात्रय रामभाऊ मुंडे याला ताब्यात घेतले. आंटी अनिता रमेश जगताप हिला बस स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी भारती यांच्या फिर्यादीवरून आश्रुबा सारूक, आंटी अनिता जगताप, व्यवस्थापक दत्तात्रय मुंडे आणि तिन्ही ग्राहकांवर अंबाजोगाई शहर पोलिसात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.


ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित, फौजदार भारत माने, महिला पोलीस सिंधू उगले, मिना घोडके, पोलीस कर्मचारी सतीश बहिरवाळ, शेख शमिम पाशा, मिसाळ, कदम यांनी पार पाडली.