सैनिकांच्या सीमेवरील कर्तव्यामुळे आपण सुरक्षित-पोलीस अधिक्षक सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाचा थाटात शुभारंभ वीरमाता, वीरपिता व विरपत्नी यांच्याप्रती केली कृतज्ञता व्यक्त


 बुलडाणा,(प्रतिनिधी) : सैन्यातील सेवा ही देशाप्रती समर्पण असून त्यांच्यामुळे देशवासी सुरक्षित आहेत. सीमेवर आपले जवान प्राणाची बाजी लावून आपल्या मायभूमीचे रक्षण करीत आहे. त्यांच्या कर्तव्य परायणामुळे आपण सुरक्षित आहोत. हा दिवस सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज केले. सैनिक कार्यालयातील सभागृहात सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाच्या शुभारंभ कार्यक्रम  संपन्न झाला. व्यासपिठावर उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ग्रुप कॅप्टन स. ह. केंजळे आदी उपस्थित होते.

    ध्वजदिन निधी संकलन करण्यामध्ये जिल्ह्याची परंपरा उत्कृष्ट असल्याचे सांगत जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले,  जिल्ह्याने राज्यात निधी संकलनात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. यावर्षी सुद्धा जिल्हा उद्दिष्टापेक्षा दुप्पट निधी संकलन करेल. सीमेवर सेवा बजाविल्यानंतर माजी सैनिक शासनाच्या विविध विभागांमध्ये माजी सैनिकांची भरती करण्यात येते. पोलीस विभागातही माजी सैनिक आहेत, माजी सैनिकांकडे असलेली शिस्त, काम करण्याची शिस्तशीर पद्धत, तसेच सातत्य वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळेच माजी सैनिक हा पोलीस विभागाचा अविभाज्य भाग आहे.

   निवासी उपजिल्हाधिकारी वराडे म्हणाले की, आयुष्याच्या ऐन तारूण्यात सैनिक आपले आयुष्य सीमेवर जगत असतो. डोळ्यात अंजन घालून सीमारेषांचे रक्षण हा सैनिक करतो. सैनिक ही नोकरी नसून देशाप्रती असलेले समर्पण आहे. अशा सैनिक, त्यांच्या कुटूंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ध्वज दिन निधी संकलनात शासनाच्या विविध विभागांचे मोठे योगदान असते. त्याप्रमाणे सामान्य नागरिकांनीही या निधी संकलनात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. उपजिल्हाधिकारी  काळे म्हणाले की, सैनिकांना महसूल प्रशासनाकडील कामांमध्ये काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ भेटावे. त्यांचे प्रश्‍न निश्‍चितच सोडविल्या जातील. त्यासाठी महसूल प्रशासन कटीबद्ध आहे. प्रास्ताविकात   केंजळे म्हणाले, ध्वजदिन निधीचा उपयोग हा माजी सैनिकांसाठी विश्रामगृह, त्यांच्या पाल्यांकरीत शिष्यवृत्ती, पाल्यांकरीता वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी होत असतो. त्यामुळे नागरिकांनी यामध्ये सढळ हाताने मदत करावी.

   यावेळी व्यासपीठाजवळ बसलेल्या वीरपिता, वीरमाता व वीरपत्नी यांच्या जवळ जाऊन मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये कु. शितल शेळके, कु. शुभांगी भगत, कु. प्रांजळ काकडे, कु. प्रतिक्षा हीचा समावेश होता. तसेच घरबांधणीसाठी संदेश रामराव गायकवाड व शिवलाल जोगळे यांना धनादेश वितरीत करण्यात आला. ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून  सन्मान करण्यात आला. संचलन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार कल्याण संघटक सुर्यकांत सोनटक्के यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget