Breaking News

भाजपचा संकटक


रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यावर खरे तर संघटनात्मक जबाबदारी आहे. पक्षातील उमदेवारांच्या मदतीला जाण्याऐवजी ते त्यांची अडचण करतात, असे वारंवार दिसले आहे. दानवे यांच्याकडे ग्रामीण शहाणपण असले आणि ते सहकारात असले, तरी भाजपचा तोंडवळा वेगळा आहे, हे त्यांना इतक्या वर्षानंतरही समजले आहे, की नाही, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. मोठमोठ्या नेत्यांकडून भाषणाच्या ओघात एखादी चूक होऊ शकते. त्याबद्दल त्यांना दोष देता येत नाही; परंतु दानवे यांच्यासारखा प्रदेशाध्यक्ष वारंवार त्याच त्याच चुका करायाल लागला, की ते गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. निवडणुकीतील प्रचाराला ते आल्यानंतर त्यांनी खरे तर जबाबदारीने बोलायला हवे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा कार्यक्रम द्यायला हवा. दानवे सातत्याने लोकसभेत निवडून येत आहेत. त्यांच्या यशाचा कानमंत्र इतरांना द्यायला हवा; परंतु त्याऐवजी त्यांच्यामुळे अडचणींचा डोंगर उभे राहत आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने संकटमोचक होण्याऐवजी संकटक होऊ नये, ही अपेक्षा वावगी म्हणता येणार नाही. दानवे यांचे ग्रामीण शहाणपण निवडणुकीच्या काळात कुठे हरवते, की काय असे त्यांच्याबाबत होऊन जाते. नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी दानवे पैठणला आले असताना त्यांनी केलेले भाषणही वादात सापडले होते. नगरपालिकेच्या निवडणुकीत पैशाचे वाटप होईल. दारी आलेली लक्ष्मी नाकारू नका. पैसे घ्या; परंतु भाजपला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्याविरोधात त्या वेळीही गुन्हा दाखल झाला होता; परंतु त्यांची चौकशी करणार्‍या अधिकार्‍याचीच नंतर तातडीने बदली करण्यात आली होती. दानवे हे असे वादात सापडतात आणि त्यांच्यासाठी सरकारला चांगल्या अधिकार्‍याची बदली करावी लागते. जनता जागी आहे. ती लगेच कोणतीही प्रतिक्रिया देत नाही; परंतु तिला जेव्हा वाटते, तेव्हा ती कोणाच्याही नकळत आपला अधिकार वापरत असते, याचे भान दानवे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने ठेवलेले बरे.


नगर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून 300 कोटी रुपये देऊ, अशी घोषणा दानवे यांनी भाजपच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी केली. भाजपला महानगरपालिकेत स्वबळावर सत्तेत यायचे आहे. त्यासाठी त्यांनी इतर पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी पायघडया घातल्या. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या लोकांनाही पावन करून घेतले. भाजप स्वबळावर तयारी करीत असताना हेच दानवे शिवसेनेशी युती करण्याची भाषा करीत होते. आताही तीनशे कोटी रुपये देण्याच्या घोषणेमुळे दानवे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. द्विवेदी यांनी या तक्रारीची चौकशी करून राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला आहे. अहवालावरील कार्यवाहीसाठी निवडणूक अधिकार्‍यांनी आयोगाचे मार्गदर्शन मागितले आहे. अहवाल तपासून योग्य निर्णय लवकरच घेऊ, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले आहे.

भाजपच्या सर्व 66 उमेदवारांच्या एकत्रित प्रचाराची सुरुवात गेल्या रविवारी झाली. सावेडी उपनगरात झालेल्या प्रचारसभेत दानवे यांचे भाषण झाले. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी आदींच्या उपस्थितीत दानवे यांनी केलेल्या भाषणात नगर शहराच्या विकासासाठी 300 कोटी रुपये देण्याचा उल्लेख केला. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने पक्षाचे माजी आमदार अनिल राठोड तसेच अपक्ष उमेदवार केतन रतिलाल गुंदेचा यांनी केली. निवडणूक रणधुमाळीत राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपैकी केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचीच नगरमध्ये प्रचारसभा झाली. या पहिल्याच सभेतील वक्तव्याने दानवे अडचणीत आले आहेत.

प्रचारसभेसाठी आचारसंहिता कक्षाचे भरारी पथक व्हिडीओसह उपस्थित होते. सभेतील दानवे यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत निवडणूक यंत्रणेतील या पथकाकडून मागवून तपासण्यात आली. “महापालिका जर आपल्या (भाजपच्या) ताब्यात आली व आपला महापौर निवडून आला तर, त्याच दिवशी याच ठिकाणच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना आणून, त्यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार करून दिलीपरावांनी (खा. गांधी) सांगितलेला 300 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांना शहरासाठी जाहीर करायला लावू, असे मी वचन देतो,’’ असे दानवे पहिल्याच सभेत बोलल्याचे निष्पन्न झाले आहे.

दानवे यांचे हे वक्तव्य निवडणुकीतील आश्‍वासन आहे की घोषणा, याबद्दल निवडणूक अधिकार्‍यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना अहवाल पाठवला आहे. हा अहवाल गोपनीय असल्याचे सांगत निवडणूक अधिकारी द्विवेदी यांनी त्यातील तपशील सांगण्यास नकार दिला. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया शुक्रवारी नगर शहरात होते. भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाल्याकडे सहारिया यांचे लक्ष वेधले असता, निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त द्विवेदी यांनी आयोगाला अहवाल पाठवल्याची माहिती दिली. त्यावर अहवाल तपासून निर्णय घेऊ, असे उत्तर त्यांनी दिले. भाजपच्या सरकारच्या काळात आचारसंहिता भंग पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही, हा पैठणाा गेल्या वर्षीचा अनुभव आहे. आताही त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ असला, तरी निवडणूक आयोग निस्पृहपणे त्यांच्याविरोधात कारवाई करणार का, हा प्रश्‍न आहे. याच दानवे यांनी शेतकर्‍यांचा अवमान केला होता. त्यांच्या सभेत शेतकर्‍याने पीक नुकसानभरपाईकडे लक्ष वेधले, तेव्हा मदत देता येते, की नाही, हे सांगण्याऐवजी त्यांनी शेतकर्‍यांचा अवमान केला होता. कितीही मदत केली, तरी रडतात साले, अशी भाषा त्यांनी वापरली होती. ही भाषा अंगलट आल्यानंतर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. दानवे यांच्या भाषेत तरीही फारसा फरक पडला नाही. धुळ्यात तर भाजपच्याच आमदाराला सभेत बोलू न दिल्यामुळे त्यांनी भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. वास्तविक ज्या ठिकाणी आपण जातो, त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला अगोदर बोलू दिले पाहिजे, हा संकेत आहे. दानवे यांच्यासमोरच भाजपतील फुटीचे नाट्य घडले. त्यामुळे संतापलेल्या अनिल गोटे यांनी भाजपचेच कसे वस्त्रहरण केले, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. दानवे यांच्यासमोर पक्षात ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला, त्यांचे गुन्हेगारीशी कसे संबंध आहेत, हे गोटे यांनी तपशीलाने जाहीर केले. प्रदेशाध्यक्षांनी पक्षातील वाद सामोपचाराने मिटवण्याऐवजी त्यांच्या उपस्थितीत वाल्याचे वाल्मिकी करण्याची प्रक्रिया होत असेल आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आचारसंहिता भंगाचा पायंडा ते पाडत असतील, तर अन्य नेत्यांनी त्यातून काय धडा घ्यायचा, हा प्रश्‍न उरतोच.