Breaking News

प्रबोधनची फुटबॉलपटू ऐश्‍वर्या भोंडे महाराष्ट्राच्या संघात
बुलडाणा,(प्रतिनिधी): अंबाला (हरियाणा) येथे होणार्‍या 19 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेकरीता निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघात प्रबोधन विद्यालयाची फुटबॉल खेळाडू ऐश्‍वर्या भोंडे हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नुकतेच कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघाची  निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 8 विभागातून  80 मुलींनी सहभाग घेतला होता.

निवड चाचणी दरम्यान ऐश्‍वर्या भोंडे हिने फुटबॉल खेळातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत निवड चाचणी उत्तीर्ण केली. त्यामुळे निवड समितीने तिची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्राच्या संघात निवड केली.परभणी येथे सुरू असलेल्या  स्पर्धेपुर्व प्रशिक्षणासाठी ती रवाना झाली आहे.  या आधी तिने दोन वेळा राष्ट्रीय  शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. ती आपल्या यशाचे श्रेय  प्राचार्य प्रफुल्ल मोहरील, क्रीडा शिक्षक रविंद्र गणेशे, आई वडील यांना देते. तिच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी शेखर पाटील, संस्थेचे अध्यक्ष बबनराव जामदार, सचिव विश्‍वंभर वाघमारे, उपाध्यक्ष उद्धवराव वाळेकर, उपप्राचार्य प्रल्हाद वंडाळे, पर्यवेक्षक प्रविण महाजन यांनी अभिनंदन केले आहे.