Breaking News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातार्‍यातून निवड चाचणी सुरुसातारा, दि. 7 (प्रतिनिधी) : जालना येथे होणार्‍या 62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील मल्लाची निवड चाचणी शुक्रवारी येथील तालीम संघ मैदानावर पार पडली. ही चाचणी दोन दिवस होणार असून 190 मल्लांनी त्यात सहभाग घेतला असून पहिल्या दिवशी स्पर्धकांची निवड चाचणी पार पडली.


जालना येथे 19 ते 23 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील मल्ल सहभागी होत आहेत. त्यानुसार तालीम संघाच्या मैदानावर शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली आहे. ही स्पर्धा माती आणि गादी या दोन प्रकारांत होत असून त्यात 57 किलो, 61 किलो, 65 किलो, 70 किलो, 74 किलो, 79 किलो, 86 किलो, 92 किलो, 97 किलो आणि महाराष्ट्र केसरीसाठी 86 ते 125 वजन किलोगटात पार पडली. त्यातील माती प्रकारात एकूण 110, तर गादी प्रकारात 80 जणांनी सहभाग घेतला आहे.


महाराष्ट्र केसरीसाठी सातारा जिल्ह्यातून गादी प्रकारात संजय सूळ (सातारा तालीम संघ), तानाजी वीरकर (आटपाडी तालीम), राजेश्‍वर पवार (सातारा तालीम संघ) आणि माती प्रकारात नीलेश लोखंडे, सचिन ठोंबरे, अभिजित निकम, जीवन घोडके, बापू भुजबळ आणि शरद पवार यांच्यात लढत होणार असून यातील विजेते मल्ल महाराष्ट्र केसरीसाठी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत. शुक्रवारी झालेल्या निवड चाचणीवेळी अनेक शौकीनांनी उपस्थित राहून या मल्लाना दाद दिली. यावेळी पुण्याचे ऑलॉम्पिकवीर पदक विजेते काकासाहेब पवार, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, जि.प.सदस्य दीपक पवार, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती व तालीम संघाचे उपाध्यक्ष संदीप मांडवे, बापू लोखंडे, चंद्रजीत सूळ, आबा सूळ, वैभव फडतरे आदी उपस्थित होते.