Breaking News

सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाने विष घेतले

बीड, (प्रतिनिधी):- खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून सय्यद सलीम बाबामियॉ (वय ४२) यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माळहिवरा (ता.गेवराई) येथे काल सकाळी घडली. सय्यद सलीम यांना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेवराई तालुक्यातील माळहिवरा येथील सय्यद सलीम बाबामियॉ (वय ४२) यांनी आज सकाळी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासुन खाजगी सावकारांकडून त्यांना त्रास दिला जात होता. त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सय्यद सलीम बाबामियॉ यांना तातडीने बीड येथील काकु-नाना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान गेवराई शहरासह तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासुन खाजगी सावकारकी मोठ्या प्रमाणावर बोकाळली आहे. एखाद्या गरजू व्यक्तीचा गैरफायदा घेत अमाप व्याजदराने पैसे दिले जात आहे. त्यातूनच असे प्रकार घडू लागल्याने संताप व्यक्त होवू लागला आहे.