Breaking News

ग्रंथालये सक्षम करण्यासाठी शासनाने निधी द्यावा- डॉ. सागर देशपांडे


पाटण (प्रतिनिधी) : सार्वजनिक ग्रंथालयांबाबत महाराष्ट्रातील कायदा 1967 सालापासून अजूनही बदललेला नाही. सरकार सार्वजनिक ग्रंथालयांना एक कोटीपर्यंत निधी देवू शकते. मात्र कायद्यात बदल न झाल्याने महाराष्ट्रातील ग्रंथालयांची संख्या घटत आहे. ग्रंथालयांना सक्षम करण्यासाठी सरकारकडून वेगळा निधी मिळाला पाहिजे. 36 वर्षे झाले तरी अद्याप ग्रंथपालांचे व सेवकांचे वेतन तीन हजाराचे पुढे सरकले नाही, अशी खंत व्यक्त करून आता ग्रंथालये जुन्या पध्दतीने चालवून चालणार नाहीत तर सार्वजनिक ग्रंथालये ही ग्रंथविक्री केंद्रे व्हावीत. त्या माध्यमातून आपणच आपली ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जडण घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी केले. श्री नागोजीराव पाटणकर स्मारक वाचनालय पाटण अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि पुणे विभाग ग्रंथालय संघ व सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे 46 वे वार्षिक अधिवेशन, पुरस्कार प्रदान सभारंभ येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. 

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर होते. यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, सनबीम शिक्षण समुहाचे अध्यक्ष सारंग श्रीनिवास पाटील, पुणे विभागाचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, पाटणच्या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, ग्रंथालय संघाचे निरीक्षक संजय ढेरे, सचिव अमरसिंह पाटणकर, नागोजीराव पाटणकर वाचनालयाचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशपांडे म्हणाले, स्वराज्यासाठी एकनिष्ठ असणारे पाटणकर घराण्याने 1 जुलै 1944 साली भीमराव पाटणकरांनी आपले वडीलांच्या स्मरणार्थ नागोजीराव पाटणकर हे वाचनालय सुरू केले. त्यांनी आपल्या जहागिरीतून वाचनालयासाठी लागणारे सर्व साहित्य दिले. त्यावेळेपासून आजपर्यंत हे ग्रंथालय वाचन संस्कृतीचे जतन करून आज अमृतमहोत्सव वर्ष साजरे करत आहे ही अभिमानाची बाब आहे. शाळा, महाविद्यालये व ग्रंथालये यामध्ये काम करणारा ग्रंथपाल याला समाजात सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.ग्रंथपाल हाच खरा पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस आहे. पुतळे उभारण्यापेक्षा महापुरूषांची नावे देवून ग्रंथालये मोठी कीर सरकारने सातारा जिल्ह्यातील भिलार हे जसे पुस्तकांचे गाव साकारले तसेच आपण सर्वांनी मिळून वाचकांची गावे निर्माण करूयात, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
अध्यक्षस्थानावरून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, माझ्या 75 वर्षाच्या कारकिर्दीपैकी 45 वर्षे राजकारणात गेली. तरी देखील मला थोडीफार वाचन संस्कृती मी ही अनुभवली आहे. ग्रंथलयांची अवस्था पाहिली तर ग्रंथालयातील कर्मचार्‍यांच्यामुळेच अत्यंत बिकट परिस्थितीतही ग्रंथालये आज सुरू आहेत ही मी स्वत: अनुभवले आहे. इतिहासातून नवी पिढी निर्माण होते. ग्रंथ हेच सर्वात मोठे आपले गुरू आहेत. वाचनानेच समाज सुसंस्कृत होवू शकतो. भारताची संस्कृती हजारो वर्ष टिकली कारण मागील पिढी पुढील पिढीसाठी काही तरी ठेवून गेली. आपल्या संस्कृतीचा अभ्यास अनेक देश करत आहेत आणि अनुकरणही करत आहेत. वाचनालयाला पाटणकर घराण्याचे यापुढेही योगदान राहिल. ही चळवळ अशीच वृध्दींगत रहावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणकर यांनी आपल्या प्रास्ताविकात नागोजीराव पाटणकर यांच्या नावाने 1944 साली सुरू झालेल्या ग्रंथालयाचे कार्य आजही अलौकीकपणे सुरू आहे. या वाचनालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे विभाग ग्रंथालय संघ व सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे 46 वे अधिवेश पाटण येथे होतय ही अभिमानाची गोष्ट आहे. आज समाजात वाचन संस्कृती दुरावत आहे. समाज अस्वस्थ व चिंताग्रस्त आहे. विवेक विचाराने समाजाने चालावे. नेतृत्व कसे असावे हे पाटणच्या खोर्‍यात पहायला मिळते, असे सांगितले. यावेळी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा ग्रंथालय संघाच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच स्व. दादासाहेब रामचंद्र पाटील मारूल हवेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात आला. विलासराव क्षीरसागर यांनी स्वागत केले. सुनिता कदम यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. डी. डी. थोरात यांनी आभार मानले. अधिवेशनास पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, सेवक, कर्मचारी व ग्रंथप्रेमी यांच्यासह कोयना शिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.