Breaking News

नियमांचे उल्लंघन करून अवनीला केले ठार; मुनंगटीवार यांच्यापुढच्या अडचणी वाढणार; व्याघ्र प्राधिकरणाचा ठपका


नवी दिल्ली : नरभक्षक वाघीण टी-1 अर्थात अवनीच्या मृत्यूबाबत आणखी गौप्यस्फोट करण्यात आला आहे. नियम तोडून तसेच मागदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून अवनी वाघिणीला ठार मारण्यात आल्याचा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने वन विभागावर ठेवला आहे.

अवनीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी 8 नोव्हेंबरला त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यात निवृत्त मुख्य वनसंरक्षक ओ. पी. कालेर, वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे उपसंचालक जोस लुईस आणि एनटीसीएचे वन विभागाचे साहाय्यक महानिरीक्षक हेमंत कामडी यांचा समावेश आहे. या समितीने अवनीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल एनटीसीएला सादर केला आहे. एनटीसीए मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन तसेच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि शस्त्र कायदा 1959 चे उल्लंघन झाल्याप्रकरणी ठोस कारवाई करावी, अशी सूचना एनटीसीएकडून महाराष्ट्र शासनाला करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र वन विभागाला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. यावर महाराष्ट्र सरकारला 15 दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्र परिसरात या वाघिणीने 13 जणांचे बळी घेतले होते. याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याचे किंवा ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वन विभागाने शार्पशूटरच्या मदतीने वाघिणीला मारले. शार्पशूटरकडून चुकीच्या पद्धतीने शिकार करून वाघिणीला ठार करण्यात आल्याचा आरोप वन्यप्रेमी संघटनांकडून केला जात आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तर या प्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. यवतमाळ येथे पांढरकवडा येथील जंगलात 2 नोव्हेंबर रोजी अवनीला मारण्यात आले. अवनीला मारणारे शार्पशूटर असगर अली खान यांनी स्वसंरक्षणासाठी अवनीला मारल्याचे म्हटले होते. त्यांचा हा दावा चौकशी समितीने फेटाळून लावला आहे. 

अवनी वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेत अनेक विसंगती असून नियम तोडून तिला मारण्याचे आल्याचे चौकशी समितीने नमूद केले आहे. ज्यावेळी अवनीला ठार करण्यात आले त्यावेळचे काही प्रत्यक्षदर्शी, गावकरी यांच्याशी समितीने संवाद साधून माहिती जाणून घेतली आहे. 


मुनगंटीवार अडचणीत

मनेका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्यावर आरोप केल्यानंतर मुनगंटीवार यांनीही त्यांच्यावर आरोप केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रस्तेबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली होती. आता अवनी वाघिणीला ठार मारण्यात अनेक नियम पायदळी तुडविल्याचे स्पष्ट झाल्याने मुनंगटीवार यांच्या अडचणीत भर पडली आहे.