Breaking News

प्रीतिसुधाजी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी घेतले गायांची धार काढण्याचे प्रशिक्षणराहता/प्रतिनिधी
आजच्या काळात सर्वच शाळांत शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट शिक्षण प्रणालीचा वापर केला जात आहे. परंतु शिक्षणातील गुरुकुल पद्धती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. महान विद्वानांना, विचारवंतांना घडवणारी ही गुरुकुल पद्धती कालपरत्वे नामशेष होत गेली. असे असले तरी राहात्यातील प्रितिसुधाजी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी मात्र आजही इंग्रजीचे धडे गिरवता गिरवता डिजीटल क्लास सिस्टीम सोबतच आदर्श गुरुकुल पद्धतीचाच मुद्दाम अवलंब डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभानजी डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

भल्या पहाटे साडेचार पाच वाजता उठून अंघोळ करून सरस्वती मंदिरासमोर टाळ मृदुंगाच्या गजरात काकडा भजन, पंचपदी, हरिपाठ, माऊलींची पाऊली खेळणारे प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी संस्कृती संवर्धनाचे जणू पाईकच आहेत. गुरुकुलमधील जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना सध्या गाईंची धार काढण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रीतिसुधाजी स्कूलच्या गोठ्यात कंदहार गायी, खिलारी गायी या देशी गायी तसेच काही विदेशी गायी आहेत.

 महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून तसेच परराज्यातून आलेले गुरुकुलमधील विद्यार्थी सकाळ संध्याकाळ गाईला बाहाला घालून त्यानंतर गाईची कास स्वच्छ धुवून गाईची धार आनंदाने काढतात. स्कूलमधील जातीवंत घोडे, जातीवंत श्‍वान, मेंढरं, शेकडो टर्की, गिज, बदक, शहामृग इत्यादी पशू - पक्ष्यांची काळजी स्कूलमधील बालकेच घेतात. त्यांना चारापाणी करून आपुलकीने भरवतात. अप्रत्यक्षपणे’ अ‍ॅनिमल केअर’ चे ट्रेनिंगच प्रीतिसुधाजी गुरुकुलमधील बालकांना दिले जात आहे. याविषयी अधिक माहिती देताना ज्ञानेशजी डांगे यांनी सांगितले की,’ कौशल्यपूर्ण शिक्षण आजच्या काळात गरजेचे आहे. भारतीय संस्कृती ही खर्‍या अर्थाने खेड्यापाड्यात आजही आहे.

हीच संस्कृती स्कूलमधील बालकांना समजावी म्हणून आमच्या स्कूलमध्ये गुरुकुल पद्धतीला अनुसरून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असतात. पशू-पक्ष्यांविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा याकरिता त्यांचे सानिध्य बालकांना विशेष काळजी घेऊन दिले जाते. निसर्गातील वेगवेगळ्या घटकांशी स्वतःहून जुळवून घेतल्याने वसतिगृहातील विद्यार्थी हे प्राचीन आनंददायी गुरुकुल पद्धतीचे जीवन अनुभवत आहेत. ’