Breaking News

विकासकामांना मनपातील दोन्ही सत्ताधार्‍यांकडूनच ‘खो’
नगर । प्रतिनिधी -
केंद्रात व राज्यात वा राज्यातील ज्या-ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, त्या-त्या ठिकाणी विकास होत आहे. त्यामुळे आता नगरमध्येही भाजपची सत्ता येणार असून नगरच्या खुंटलेल्या विकासास चालना मिळणार आहे. अनेक योजना शहरात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले. परंतु येथील मनपातील दोन्ही सत्ताधार्‍यांनी श्रेय भाजपला मिळेल म्हणून या योजनांना ‘खो’ घालण्याचेच काम केले. तरीही भाजप नगरसेवकांच्या मदतीने शहरातील विकास कामांसाठी निधी मिळवून दिला. मात्र आता तुम्ही भाजपला मतदान करुन एकहाती सत्ता द्या. या नगर शहराला विकास काय असतो हे दाखवून देऊ, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

महापालिका निवडणुकीतील भाजपच्या प्रभाग 4 व 5 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची सिव्हिल हडको येथे जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. 

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, सुनील रामदासी, नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रसाद ढोकरीकर, बाळासाहेब गायकवाड, उमेदवार महेंद्र गंधे, मनोज दुलम, स्वप्नील शिंदे, चंदर मोतियानी, आशा कराळे, सोनाबाई शिंदे, संगीता खरमाळे, वंदना कुसळकर आदी उपस्थित होते. या सभेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसाद ढोकरीकर यांनी केले तर आभार बाळासाहेब गायकवाड यांनी मानले.