Breaking News

विधानसभेच्या दावेदारीसाठी आ.मेटेंची जिल्हा परिषदेत सत्तांतराची भुमिका..!


बीड (प्रतिनिधी)- शिवसंग्रामचे युवा माजी प्रदेश अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्यानंतर बीड जिल्ह्यात एकाकी पडलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी आज जिल्हा परिषद अंतर्गत ठोस भुमिका घेण्याचा निर्णय घेतला असुन शिवसंग्रामच्या पाठींब्यावर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असल्याने भाजपा गटात आ.मेटेंच्या भुमिकेमुळे खळबळ उडाली आहे. भाजपाच्या चिन्हावर मागील विधानसभेची निवडणूक लढविणारे व थोड्याच फरकाने पराभवाला सामोरे गेलेले मेटे येणार्‍या विधानसभेच्या निवडणूकीसाठी तयारीला लागले आहेत. मात्र पालकमंत्री ना.मुंडे यांच्यात व आ.मेटेमध्ये विस्तवही जात नसल्याने जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांना बीड विधानसभेसाठी तयारीला लागा असे पक्षश्रेष्टी कडुन कानमंत्र दिला असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच अस्वस्त झालेले मेटे जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतरांची भुमिका घेतांना दिसत आहे. 

आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने भाजपा सोबत महायुती करत लोकसभा आणी विधानसभेला भाजपाला मदतीचा हात दिला. सरकार स्थापन होऊन चार वर्षे उलटले त्यांच्या मंत्री पदाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलाच नाही. बीड जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत सूर जुळले नाही. नेहमी पंकजा मुंडे विनायक मेटे यांच्यात शितयुद्धच पाहण्यास मिळाले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानमंत्रामुळे बीड जिल्हापरिषद भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी मेटेंच्या शिवसंग्रामचे चार जिल्हापरिषद सदस्य भाजपाकडे गेले आणि जिल्हापरिषद राष्ट्रवादीच्या तोंडातून खेचून आणली. याची परतफेड म्हणून जिल्हापारिषदेचे उपाध्यक्ष पद शिवसंग्रामच्या राजेंद्र मस्के यांच्याकडे बहाल करण्यात आले. 
जिल्हापरिषदेत ताब्यात असताना मेटे गटाच्या हाती काही लागले नाही उपाध्यक्ष ज्यांना केले तेच सोडून गेल्याने मेटे यांची अस्वस्थता वाढू लागली. ना बीडच्या जिल्हापरिषदेत ना राज्याच्या राजकारणात काही फायदा, हे ओळखून मेटेंनी आता बंडाचे निशाण फडकावले आहे. बीड जिल्हापरिषदेतील उपाध्यक्ष पद मस्के ऐवजी शिवसंग्रामच्या इतर सदस्यांना द्यावे ही मागणी असू शकते यातूनच पाठिंबा काढण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. आज शनिवारी शिवसंग्रामच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे . मेटे यांनी जिल्हापरिषदेतील सदस्यांचा पाठिंबा काढल्यास भाजपा समोरच्या अडचणीत वाढ होऊ शकते हे निश्चित आहे. जिल्हा परिषद सत्तांतर हे तर बहाणा आहे, आ.मेटेंच्या पुढील व्यूव्हरचनेतील हा एक भाग असु शकतो. बीड विधानसभेसाठी भाजपा नविण चेहर्‍याला संधी देवू शकतो हे मेटेंच्या लक्षात आल्याने बंडाचे निशान खांद्यावर घेत भाजपाला अडचणीत आणण्याचे काम करत असुन राजेंद्र मस्के बहाणा है..! पोकळे तो असली निशाना है..!