Breaking News

नाशिक सापुतारा महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
सुरगाणा प्रतिनिधी
सापुतरा-नाशिक महामार्गावर प्रवाशांना अडवून लूट करणाऱ्या टोळीस ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) शनिवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकी तसेच, इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.कल्पेश बाबुराव वाघमारे (वय १८, रा. पळसेत, ता. सुरगाणा), धर्मराज काशिनाथ गायकवाड (वय २२, रा. शिराटा, ता. सुरगाणा), बाबू थविल (रा. गारमाळ, ता. सुरगाणा) व केशव वारडे (रा. पळसेत, ता. सुरगाणा) अशी या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील भदर गावातील रहिवासी सुभाष चिंतामण पवार हे आपल्या दुचाकीवर सुरगाणा येथे जाण्यासाठी निघाले होते. नाशिक ते सापुतारा महामार्गावर घोटूळ गाव शिवारात अज्ञात चार संशियितांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाइल फोन व दुचाकी असा एकूण ३३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणी सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 


एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने या गुन्हयातील फिर्यादीकडे बारकाईने चौकशी केली. गुन्ह्याच्या कार्यप्रणालीवरून गुन्हेगार हे त्याच परिसरातील असल्याचा अंदाज आल्याने सुरगाणा ते सापुतारा महामार्गावर संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. काही संशयित हतगड परिसरात गुन्ह्यातील लुटमार करून नेलेली दुचाकी नंबरप्लेट काढून वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हतगड शिवारात रात्रभर सापळा लावून संशयित वाघमारेसह गायकवाडला अटक केली. त्यांनी बाबू थविल व केशव वारडे या दोन साथिदारांची नावे सांगितली. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, रामभाऊ मुंढे, संजय पाटील, पोहवा हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, जे. के. सूर्यवंशी, संदीप शिरोळे, कैलास देखमुख, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, रमेश काकडे व चौधरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.