लोकर कातरणीसाठी माणदेशी मेंढपाळांची लगबग


बिदाल (प्रतिनिधी) : माण तालुक्यात सध्या मेंढपाळ मंडळींची मेंढ्यांची लोकर कातरण्याची धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी मेंढपाळ मंडळी कातरकरी जमा करून मेंढरांची लोकर कातरतात. मेंढरांची लोकर कातरणार्‍या मेंढपाळाला धनगरी भाषेत कातरकरी म्हणतात. टाकेवाडी, दोरगेवाडी, रांजणी, गटेवाडी, पांगरी, देवापूर, विरकरवाडी, पुकळेवाडी, बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, कुरणेवाडी, शेनवडी, या गावात सध्या लोकर कातरण्याचे काम जोमाने सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सर्वसाधारणपणे व्यावसायिक मेंढपाळाच्या एका ताफ्यात 30 ते 40 मेंढ्या असतात. कळपात असणार्‍या लहान कोकराची कातरण केली जात नाही. 

सामूहिकपणे चार-पाच कातरकरी लोकर कातरणी करतात. मेंढरांची लोकर वर्षातून दोनदा कातरली जाते. आँगस्ट व नंतर डिसेंबर, या महिन्यात लोकर कातरतात. मेंढया कातरण्यापूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर धुतल्या जातात. साधारणत: ही कातरणी दोन प्रकारची असते. समान पट्टीच्या रेषेत दोन रेघा काढतात, त्यास सरळ कातरणी म्हणतात. तर दुसरीस तास पद्धत म्हणतात. त्यात मेंढराच्या पाठीवर तिरक्या रेषा काढून त्याला गोंडे काढले जातात. मेंढराची कातरणी करताना कातरकरी मेंढीला जमिनीवर झोपवतात, बसवतात तर कधी कधी उभा करतात तर मधूनच आडवेही करतात. कधी कधी मेंढीच्या मानेवर पाय देवूनही ही कातरणी केली जाते. पूर्वी कातरकरी सामूहिक (इर्जिक) पध्दतीने लोकर कातरणीचे काम करायचे. आज एकाची तर उद्या दुसर्‍याची तर त्या नंतर तिसर्‍याच्या ताफ्याची अशा पध्दतीने पैरा पध्दतीने मेंढरांची लोकर कातरली जायची. लोकर कातरणीच्या दिवशी दिवसभर लोकर कातरण्याचे काम झाल्यानंतर संध्याकाळी गोड पुरणपोळीचे जेवण कातरणी करणारांना केले जात असे. सध्या कातरणीच्या पध्दतीत फारच बदल झाला आहे. पूर्वीची इर्जिक पध्दत आता बंद झाली आहे. सध्या रोजगार देऊन लोकर कातरावी लागत आहे. एक कातरकरी साधारण दिवसभरात पाच ते सहा मेंढरे कातरतो. त्यांना एक दिवसासाठी 300 रूपये इतकी मजूरी द्यावी लागते. आत्ताच्या जमाण्यातील मेंढपाळ वर्ग मेंढराची लोकर कातरणारी संख्या कमी होत चालली आहे. सध्याच्या तरूण मेंढपाळांना लोकर कातरणी करण्याचा छंद कमी आहे. कातरकर्‍यांची संख्या कमी असल्याने कातरकर्‍यांची रोजगाराची चांदी सुरू झाली आहे. सगळीकडे एकाच वेळी मेंढरांची लोकर कातरत असल्याने कातकर्‍यांचा शोध घ्यावा लागत आहे. माण तालुक्यात सध्या काळ्या लोकरीच्या मेंढरांचा तूटवडा आहे. काळ्या लोकरीला दर चांगला मिळतो. पांढर्‍या, तांबड्या लोकरीला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे कधी कधी तर लोकर फुकट द्यावी लागत असल्याचे मेंढपाळ सांगत आहेत. सध्या लोकरीला 15 ते 20 रूपये प्रतिकिलो दर मिळत आहे. आषाढ महिन्यात थंड हवा व रिमझिम पाऊस पडत असल्याने मेंढपाळ श्रावण महिना निवडतात मेंढीच्या अंगावर जास्त प्रमाणात लोकर असते. लोकर जास्त असते त्यामुळे मेंढरे पावसाळ्यात आजारी पडतात. आजारी पडलेली मेंढरे लवकर बरी होत नाहीत. सध्या मेंढर कातरणीसाठीची मोठी लगबग परिसरात सुरू आहे. मेंढपाळांची संख्या जास्त आहे आणि कातरकर्‍यांची संख्या कमी असल्याने मेंढपाळांना कातरकरी शोधण्यासाठी कसरत करावी लागत. मेंढरे कातरण्यासाठी सध्या माण तालुक्यात नंबर लागले आहेत. ही लगबग एकाच वेळी असल्याने कातरकर्यांना सूगीचे दिवस आले आहेत. एका दिवसात दोन दोन मेंढपाळांची मेंढर कातरली जात आहेत. कातरकर्‍यांना डबल रोजगार मिळत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget