Breaking News

एमआयडीसी परिसरातून एचआयव्ही जनजागृती फेरीनगर । प्रतिनिधी -
जागतिक एड्स सप्ताहानिमित्त अहमदनगर जिल्हा रुग्णालय, लार्सन अँड टुर्बो लि., अमृतवाहिनी संस्था आणि मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज, काकासाहेब म्हस्के विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रातील स्थलांतरित कामगारांमध्ये एच.आय.व्ही.संबंधी जनजागृतीसाठी प्रचार फेरी काढण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रुग्णालयाचे नोडल ऑफिसर डॉ. पारधे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संजय जोशी, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक गोरे, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे अधिकारी शिवाजी जाधव, जिल्हा पर्यवेक्षक सुनील गिरी, काकासाहेब म्हस्के विद्यालयाच्या प्राचार्या बांगर, अमृतवाहिनी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख आदी उपस्थित होते.

यावेळी जोशी पुढे म्हणाले, पुष्कळदा आपल्याकडे जे आहे त्याची किंमत माणसाला नसते. आज ज्यांच्याकडे निरोगी शरीर आहे, सुदृढ मन आहे, त्याची किंमत कोणत्याही दुर्घर रोगाने ग्रासल्यावर हॉस्पिटलची बिले व होणार्‍या वेदनानंतर होते. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. म्हणुन युवकांनी आजच आपल्या आरोग्याबाबत जागरुक होऊन एचआयव्ही किंवा अशा कोणत्याही व्याधींग्रस्त रुग्णांबाबत संवेदनापूर्ण व्यवहार करावे.

उपनिरीक्षक गोरे यांनी एड्स जनजागृतीत युवकांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे जाधव यांनी एच.आय.व्ही. बद्दलचे गैरसमज व प्रतिबंधात्मक उपाय याची माहिती दिली. डॉ. पारधे यांनी शासनामार्फत एचआयव्ही निर्मुलनासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रकल्प व्यवस्थापिका प्रतिभा तळेकर यांनी प्रकल्पामार्फत राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्या बांगर, जिल्हा पर्यवेक्षक सुनील गिरी यांनी एचआयव्ही एडस्बाबतच्या गैरसमजाविषयी सविस्तर माहिती दिली.

औद्योगिक परिसरातून ही फेरी काढण्यात आली. यावेळी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एचआयव्हीसंबंधी विविध घोषणा दिल्या. मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज येथे फेरीचा समारोप झाला. यावेळी काकासाहेब म्हस्के विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी कायमस्वरूपी कार्य करण्याची शपथ घेतली. यावेळी एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर म्हणाले, युवा वर्ग जर जनजागृतीसाठी पुढे आला तर एच.आय.व्ही. संसर्ग शून्य होण्यास वेळ लागणार नाही.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषभ फिरोदिया, संतोष निकम, विलास कुलकर्णी, सिराज शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बनसोडे, श्रीमती गुंड, बाबासाहेब सांगळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रचारफेरीतील सहभागींना एल अ‍ॅण्ड टी कंपनीतर्फे अल्पोपहार देण्यात आला.