Breaking News

पेट्रोल विक्री रिटेल आऊटलेटसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सोपी : राजेंद्र गणोरेसातारा, दि. 7 (प्रतिनिधी) : भारत पेट्रोलिअम, इंडियन ऑईल व हिंदुस्थान पेट्रोलिअम यांच्यावतीने दुर्गम आणि ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल विक्रीसाठी आऊटलेटचा विस्तार वाढविण्यासाठी शासनाची योजना असून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोलिअमचे राजेंद्र गणोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी इंडियन ऑईलचे मॅनेजर सचिन वैरागडे व सेल्स ऑफीसर स्वप्निल सोनावणे यांची उपस्थिती होती.
याबाबत अधिक माहिती देताना गणोरे म्हणाले, शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी आता दुर्गम आणि ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल विक्रीसाठी पंप देण्यासाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

ज्यांना यासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांच्याकडे स्वत:ची जागा नसली तरी ते पेट्रोलपंपासाठी अर्ज करु शकतात मात्र, त्यांची निवड झाल्यानंतर तीन महिन्यात जमिनीचे कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. ज्यांच्याकडे आधीपासून पेट्रोलपंप आहेत अशा वितरकांनाही अर्ज करता येणार आहेत परंतु त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. यासाठी आवेदनपत्र भरताना 10 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे यासाठी अर्जदार हा केवळ दहावी पास असावा ही पात्रता ठेवण्यात आली आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ड्रॉ पद्धतीने पेट्रोल पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे इतर अनेक जोडधंद्यांनाही उत्तेजन मिळून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.