दत्तक बापावर अवलंबून राहण्याची गरज नाही शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीकानाशिक (प्रतिनिधी)ः काहींनी सांगितले, की मी जिल्हा दत्तक घेतो. मला गंमत वाटली. आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे. आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही. बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने, कर्तृत्त्वाने चालवणारे लोक आहोत. आम्हाला माहीत होते, की हे दत्तक विधान काही टिकणार नाही. आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामोल्लेख टाळून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आपला खराखुरा जो बाप शेतकरी आहे, तोच आपला खरा घटक आहे. त्याच्या मदतीने पुढे जाऊया असे ते म्हणाले. 

नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या जाहीर प्रवेशासाठी पवार पक्ष कार्यालयात आले होते. या वेळी पवार यांनी हिरे कुटुंबीयांचे पक्षात स्वागत केले. शिवाय नाशिकचे आणि नाशिकच्या शेतकर्‍यांच्या कष्टाचे कौतुकही केले. भाऊसाहेब हिरे यांच्या नाशिकसाठीच्या योगदानाबाबतही त्यांनी भाष्य केले. फळबागायतीमध्ये क्रांती केलेला हा नाशिक जिल्हा असल्याचे गौरवोद्गार पवार यांनी या वेळी काढले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की नाशिकरांनी नेहमीच शरद पवार यांच्या विचारांना साथ दिली आहे. नाशिककरांच्या कोणत्याही समस्यांची जाण सरकारला नाही; परंतु शरद पवार हे नेहमी शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. पाटील यांनी हिरे कुटुंबीयांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे नाशिकसह दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ यांना आणखी ताकदीने काम करता येणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

भुजबळ यांनी, संकटामध्ये जसे विठ्ठलाचे, पांडुरंगाचे नाव आठवते, तसे दुष्काळातील संकटामध्ये शरद पवारांचे नाव देशातील शेतकर्‍यांना आठवते, असे सांगतानाच नाशिक जिल्हा शरद पवारांवर प्रेम करणारा असून येत्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध करून दाखवू, असे भुजबळ यांनी या वेळी दिले. हिरे कुटुंबीयांशी काही काळ दुरावा निर्माण झाला होता; परंतु आता कोणताही दुरावा नाही. त्यांना नाशिकच्या राजकारणामध्ये मानाचे स्थान दिले जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

या वेळी प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरे यांची भाषणे झाली. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि पक्षाचे उपाध्यक्ष नवाब मलिक, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर-पाटील, नाशिकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे, महिला कार्याध्यक्षा डॉ.भारती पवार, माजी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार जयंतराव जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget