Breaking News

जगात ज्ञान हेच सर्वात मौल्यवानः शंकराचार्य विधुशेखर भारतीसातारा,
आजच्या काळात प्रत्येकासाठी धन, संपत्ती महत्वाची असली, तरी सर्वांत मौल्यवान असे ज्ञानच आहे. धनाचे महत्व व्यावहारिक जगतात असले तरी जो ज्ञानसंपन्न आहे, त्याला सर्व जगात अधिक मान, सन्मान असतो. प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांनी ज्ञान प्राप्त करुन घ्यावे, कारण ज्ञान मिळवण्यासाठी कोणतेही वय चालते. जीवनात संपूर्ण आयुष्य माणूस हा ज्ञानाचा भुकेला हवा, असे मार्गदर्शन श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विधुशेखर भारती महास्वामी यांनी सातारा येथे केले.

चिमणपुरा पेठेतील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत महास्वामींचे दोन दिवसांच्या मुक्कामात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. त्यामध्ये सातारा येथील कार्यक्रमाचे संयोजक वेदमुर्ती विवेकशास्त्राी गोडबोले यांनी समस्त सातारकरांच्यावतीने महास्वामींना कृतज्ञता पत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. महावस्त्र, कंदी पेढ्यांचा हार, दक्षिणा, पुष्प असे या सत्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी सन्मानपत्राचे वाचन प्रवरा करंदीकर यांनी केले. या सन्मानपत्राचे संस्कृत भाषेतून अतिशय सुरेख लेखन पुण्यातील परशुराम परांजपे यांनी केले होते. यावेळी जिल्हाधिकरी श्‍वेता सिंघल यांनीही उपस्थित राहून महास्वामींचे दर्शन घ़ेतले. 

यावेळी महास्वामींनी विशेष आस्थापूर्वक जिल्ह्यातील विविध घडामोडींविषयी जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती घेतली. त्यानंतर महास्वामींनी उपस्थितांना सांगितले की, भक्ती करताना एकाग्रता हवी. अन्यथा नुसते शरीराचे श्रम होतात. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक केल्यास ती साध्य होईल. जप, चिंतन, ध्यान, मनःपूर्वक व एकाग्रतेने करा, तरच अपेक्षित देव साध्य होईल. सद्गुरूकृपा व गुरूंच्या पाठबळाशिवाय काहीही शक्य नाही. विद्यार्थ्यांनी विद्याभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून अपेक्षित ध्येय गाठावे.