Breaking News

माजी आमदार लक्ष्मण मानेंच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाची गांधीगिरी


सातारा (प्रतिनिधी) - आमदार लक्ष्मण माने यांनी पुणे येथील ओबीसी जागर परिषदेत मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतर झालेला प्रक्षोभ कमी व्हावा यासाठी त्यांच्या निवासस्थानी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गांधीगिरी स्टाईलच्या आंदोलनाने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचल्याने तणाव निवळला. 

मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद सुरु असताना माने यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय बापू क्षीरसागर यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे आगमन झाले. यावेळी क्षीरसागर यांनी ‘मानेसाहेब आमचं काही चुकलं असेल तर माफ करा, तुम्ही खूप मोठे आहात आम्ही छोटी माणसं आहोत तेव्हा आम्हाला माफ करा’ असे म्हणत माने यांनी निवासस्थानाबाहेर येवून खुलासा करावा अशी मागणी केली. मात्र माने यांनी त्यांच्यासमोर येणे टाळले. बर्‍याच वेळा विनवणी केल्यानंतरही लक्ष्मण माने हे बाहेर येत नव्हते. त्यानंतर माने यांच्या संरक्षणासाठी असलेल्या कर्मचार्‍याने वरिष्ठांना ही बाब कळवताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ आपला फौजफाटा घेवून याठिकाणी आले. त्यांनाही आंदोलनकर्त्यांनी मानेसाहेबांपर्यंत आमच्या भावना पोहोचवा अशी विनंती केली बराच वेळ चर्चा झाल्यानंतर धुमाळ यांनी मोर्चेकर्‍यांचा निरोप माने यांना पोहोचवला. त्यावर माने यांनी लेखी टाईप केलेला माफीनामा त्यांच्याजवळ दिला. त्यानंतरही काही काळ आंदोलक आंदोलनावर ठाम होते. आंदोलकांशी पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी चर्चा केल्यानंतर ते माने यांचा माफीनामा वाचण्यास तयार झाले. यावेळी त्यांनी सर्वासमक्ष हा माफीनामा वाचला. त्यानंतर पोलिसांच्या विनंतीला मान देवून बापू क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते निघून गेले.
सभ्य भाषेत मानेंना विनंती...
यावेळी आंदोलकांनी अत्यंत सभ्य भाषेत आमदार माने यांना बाहेर येण्याची विनंती केली. मात्र आमदार यांनी ती मानली नाही. माझे त्यांच्याशी भांडण नाही, मी बाहेर येणार नाही असेच ते शेवटपर्यत म्हणत होते.
घटनास्थळावर मोठा तणाव...
यावेळी घटनास्थळावर मोठा तणाव निर्माण झाला होता. शाहूपुरी पोलीस ठाण्याने वाहनासहीत काही पोलीस कर्मचारी तातडीने याठिकाणी बोलावत बंदोबस्तात वाढ केली. आंदोलक निघून गेल्यानंतर तणाव निवळला.
लक्ष्मण माने तणावात...
यावेळी आंदोलकांचा पवित्रा अत्यंत मवाळ वाटत असला तरी माने यांनी त्यांच्या मवाळ बोलण्याचाच धसका घेतल्याचे जाणवत होते. अत्यंत तणावात असलेल्या उपराकार लक्ष्मण माने यांनी यानंतर आपण स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे जावून घडलेल्या घटनेविषयी माहिती देणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व आंदोलनकर्ते लक्ष्मण माने यांच्या निवासस्थानाबाहेर उभे राहूनच त्यांना बाहेर येण्याची विनंती करत होते.
पोलीस निरीक्षकांची मध्यस्थी...
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी अत्यंत कुशलतेने ही तणावाची परिस्थिती सांभाळली. आंदोलक आणि लक्ष्मण माने यांच्याशी चर्चा करत त्यांनी तणाव निवळण्याचे काम केले.
मला टार्गेट करुन बदनाम करण्यात येत आहे : लक्ष्मण माने 
सातारा, दि. 15 (प्रतिनिधी)ः मी बोललो की नाही याची कसलीही खातरजमा न करता किंवा मला न विचारता सोशल मिडियाने माझ्याविरुद्ध आघाडी उघडली, त्यामुळे ज्या भावंडांच्या भावना दुखावल्या असतील मनात प्रक्षोभ निर्माण झाला असेल तर त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की, मी कोणाच्याच जातीचा उल्लेख केलेला नाही, तरीही जे बांधव चिडलेले आहेत ज्या भगिनी खूपच चिडलेल्या आहेत त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो या पद्धतीने मला टार्गेट करुन बदनाम करण्यात आहे, अशा शब्दात माजी आमदार उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. पुणे येथील ओबीसी जागर परिषदेत केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, ही क्लिप तयार करुन सोशल मिडियावर व्हायरल करणार्‍या शिवथर येथील शिवराज ठवरे याच्याविरोधात फौजदारी तसेच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपराकार माने म्हणाले, कुत्र्याला मारायचे असेल तर ते पिसाळलं आहे अस आधी म्हणा, आणि मग त्याला गोळी घाला, तशी व्यवस्थेन माझी अवस्था केली आहे मी स्त्रियांचा सर्वाधिक आदर करणारा माणूस आहे. या स्त्रियांनाच माझ्या अंगावरती घालून माझी बदनामी करण्याचा कट न्यायालयात उघड झाला. मी निर्दोष मुक्त झालो आता हे तमाशा कलावंतांच्या निमित्ताने पुन्हा स्त्रियांचाच प्रश्‍न आणून मला बदनाम करण्याचा हितशत्रूंचा कट आहे. मी माझ्या भाषणात मराठा हा शब्द वापरलेला नाही तरीही सोशल मिडियांनी माझा बकरा केला. मी जे म्हणालो नाही ते ते माझ्या नावाने व्हायरल करण्यात आले. यासंबंधी मी जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर म्हणणे दिले आहे. ज्या माझ्या मित्रांनी माझ्या जिवाला धोका निर्माण केला. मला रोज ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत त्यांच्यावर मी फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करत आहे. अब्रूनुकसानीचे गुन्हे दाखल करत आहे. माझ्या दिलगिरीनंतर समाजातील सर्व बांधवांनी या क्रियाप्रतिक्रिया थांबवाव्यात असे मी त्यांना नम्र आवाहन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी माझ्या भाषणात पाटील असा जो शब्द उच्चारला आहे तो कोण्या एका जातीचा नसून तमाशा पहायला येणारा प्रत्येकजण नाचणार्‍या तमासगीर महिलेसाठी पाटीलच असतो या भावनेतून म्हटले होते. त्याची जात कोणती असा कोणताही उल्लेख मी केला नव्हता. यापुढील काळात आपण आता केवळ पोलिटीकल भाषण करणार आहे, सामाजिक भाषणाचे दुष्परिणाम काय होतात हे मी आता भोगत आहे असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.