Breaking News

वीजेची दरवाढ; फौंड्रीसह इंजिनिअरींग उद्योग अडचणीत


सातारा (प्रतिनिधी) : महावितरणने इंजिनिअरिंग आणि फौंड्री उद्योगासाठी सुमारे 20 टक्के दरवाढ लादली आहे. या दरवाढीमुळे हे उद्योग अडचणीत येणार असून, यापुढे होणारी मोठी गुंतवणूक थांबणार असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने जीएसटीच्या माध्यमातून एक कर प्रणाली पद्धत सुरू केली असताना, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दरवाढ केल्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. 

वीज दरवाढीच्या विरोधात उद्योजक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे औद्योगिक विश्‍वात असंतोष खदखदत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त फौंड्री व्यवसाय आहे. त्यामध्ये साधारणत: सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता साधारणत: 12 हजार उद्योजकांची नोंदणी असून सुमारे 1.5 लाख कामगारांना थेट, तर 2 लाख कामगारांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता इंजिनिअरिंग उद्योगही मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात 1,630 इंजिनिअरिंग वर्कशॉप, 100 फौंड्री आणि विविध मशिनरी बनवणारे 6500 उद्योजक कार्यरत आहेत. सर्वांच्या माध्यमातून सुमारे 1.5 लाख कामगारांना रोजगार मिळाला आहे. 

गेल्या काही वर्षांत इंजिनिअरिंग आणि फौंड्री उद्योजकांना फारसे चांगले दिवस नव्हते. मात्र, काही महिन्यांपासून या उद्योगांना अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हयात सुमारे 350-400 कोटींची गुंतवणूक या उद्योगात होणार आहे. त्यादृष्टीने उद्योजक पावले उचलत आहेत. मात्र, वाढीव वीज दराच्या शॉकमुळे उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, वीज दर मागे न घेतल्यास ही गुंतवणूक थांबणार आहे. ही गुंतवणूक थांबल्यास रोजगाराची संधी बुडण्याची शक्यता आहे. सध्या वस्त्रोद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. तुलनेत या दोन उद्योगांतील कामगारांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, वीज दरवाढ कायम राहिल्यास त्यांच्यावरही बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता आहे. चोरी, भ्रष्टाचार करणार्‍यांच्या पाठीशी महावितरण व सरकार असून, प्रामाणिक कर भरणार्या फौंड्री आणि इंजिनिअरिंग उद्योगाला मात्र सरकार आणि महावितरणकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत उद्योजक बोलून दाखवत आहेत. एमईआरसी यांचा याबाबत गुरुवार, दि. 20 डिसेंबर रोजी एक निर्णय होणार असल्याने उद्योजकांकडून सांगण्यात आले. या निर्णयाकडे उद्योजकांचे लक्ष लागून राहिले आहेे. हा निर्णय उद्योजकांच्या विरोधात असेल, तर दि. 21 पासून संघर्षाची तयारी उद्योजकांनी केली आहे. यापूर्वी कधीही रस्त्यावर न उतरलेले हे उद्योजक वीज दराच्या प्रश्‍नावर आक्रमक झाले आहेत.