Breaking News

अनुवादाची कला हा जीवनाचा अविभाज्य भाग : डॉ. सौ. कुलकर्णीकराड, (प्रतिनिधी) : मराठी भाषेबद्दल अस्मिता मनामध्ये असली तरी कानडी भाषेतील दर्जेदार व चांगले साहित्य मराठी वाचकांना मिळावे, या भावनेतून आपण अनुवादाकडे वळलो असून अनुवाद ही कला आहे, असे उद्गार मराठी साहित्य क्षेत्रातील अनुवादिका डॉ. सौ. उमा कुलकर्णी यांनी काढले.

येथील (कै.) बाबूराव गोखले स्मारक समितीतर्फे कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात समाजभूषण बाबूराव गोखले स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘संवादू अनुवादू : एक संवाद’ या विषयावर डॉ. सौ. उमा कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, बँकेचे संचालक वि. पु. गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, स्मारक समितीचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव शिखरे, कार्यवाह वि. के. जोशी व माधव माने यांच्यासह कराडमधील मान्यवर उपस्थित होते.


डॉ. सौ. कुलकर्णी म्हणाल्या, मराठी भाषेबद्दल माझ्या मनात अस्मिता असली तरी लग्नानंतर माझे पती विरूपाक्ष यांची भाषा कन्नड होती. लग्नानंतर पुण्यात रहायला गेले, त्यावेळी घरात कन्नड आणि बाहेर मराठी असा अलिखीत करारच झाला होता.