Breaking News

छत्तीसगडमध्येही शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा


नारायपूर : तीन राज्यात काँगे्रसचे सरकार स्थापन होताच, तेथील मुख्यमंत्र्यांनी कामकाजाला सुरूवात केली आहे. मध्यप्रदेश मध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांच्या आतच शेतकर्‍यांची कर्जमाफी जाहीर केली. मध्यप्रदेशपाठोपाठ छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कर्जमाफी करण्याची घोषणा केली. 

एवढेच नाही तर, भाताचे समर्थन मुल्यही वाढवून 2500 रुपये केले आहे.

छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ विधी आटोपल्यानंतर मध्यप्रदेश येथे कमलनाथ यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. तसेच प्रस्तावावर स्वाक्षरी करुन 2 लाखांपर्यंत शेतकर्‍याचे कर्ज माफही केले आहे. त्यानंतर छत्तीसगड येथे भूपेश बघेल यांनीही वचनपूर्ती केली आहे. काँग्रेसने निवडणुकांच्या वेळी जनघोषणा प्रमाणपत्रामध्ये शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर 16 लाख शेतकर्‍यांचे 6 हजार 100 कोटी एवढे कर्ज माफ करण्याची घोषणा बघेल यांनी केली. तर त्यामध्ये भर म्हणून भात पिकाच्या समर्थन मुल्य 2500 रुपये करण्याचीही हमी दिली आहे. तसेच झीरम घाट येथील नक्षलवादी हल्ल्याचा कसून तपास केला जाईल, असेही म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी विशेष तपास पथक तयार करण्याचीही घोषणा केली आहे. या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थिती क्षमा केली जाणार नाही, असेही त्यांनी घोषणा करताना म्हटले आहे.