Breaking News

नाफेडला विकलेल्या मालाचे गोडावून फोडण्यासाठी धडकले शेतकरीचिखली,(प्रतिनिधी): नाफेडला विकलेल्या मालाचे गोडावून फोडण्यासाठी गेलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जिनिंगच्या अध्यक्षाने वीस दिवसात शेतकर्‍यांच्या मालाचे पैसे देण्याचे लेखी आश्‍वासन दिले. या आश्‍वासना नंतर हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले आहे. मागील हंगामामध्ये नाफेडने जिनिंग प्रेसिंग या संस्थे मार्फत हरभरा, तूर, सोयाबीन व उडीद या मालाची खरेदी केली होती.

परंतु दहा महिने उलटूनही शेतकर्‍यांना पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेकडे धाव घेतली होती. त्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 26 डिसेंबर रोजी जिनिंग प्रेसिंग व तहसीलदार चिखली यांना निवेदन देऊन 3 डिसेंबर पर्यंत शेतकर्‍यांना पैसे न मिळाल्यास जिनिंगचे गोडाऊन फोडून शेतकर्‍यांचा माल परत नेण्यात येईल, असा गर्भित इशारा दिला होता.

परंतु या इशार्‍याची कुठलीच दखल प्रशासनाने आणि जिनिंगने घेतली नाही. त्यामुळे चिडलेले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज गोडावूनवर चालून गेले. या ठिकाणी जिनिंगचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी यांच्यात नायब तहसीलदार कुणाल झाल्टे व पोलीस कर्मचार्‍या समक्ष बाचाबाची झाली. यावेळी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी आक्रमक पावित्रा घेत जिनिंगच्या पदाधिकार्‍यांना धारेवर धरले. तर स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव पाटील आणि माजी उपसभापती भानुदास घुबे यांनी प्रश्‍नाचा भडीमार करून पदाधिकार्‍यांना कोंडीत पकडले.

दीर्घ चर्चे नंतर नायब तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या साक्षीने जिनिंगचे अध्यक्ष गणेशराव कोल्हे, उपाध्यक्ष नारायणराव काळे , संचालक शाम पाटील यांनी वीस दिवसात शेतकर्‍यांच्या मालाचे पैसे देण्याचे लेखी आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले. या आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव पाटील, शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव, समाधान कणखर, देविदास कणखर, मुरलीधर येवले, भानुदास घुबे, राजू शेटे, विलास मुजमुले, देविदास भगत, भानुदास थुट्टे, भिकाभाऊ सोळंकी, दिनकरराव टेकाळे, लतीराम शेळके, सादीक देशमुख, विनायक सरनाईक, हरिभाऊ पैठणे, विनोद थुट्टे, शंकर पैठणे, हरिदास खांडेभराड, बबनराव कदम, नंदू बैरागी, संजय जावळे, गजानन थुट्टे, बद्री मूळवंडे, प्रकाश आंभोरे, शेषराव शेळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.