Breaking News

जागा मालक व विडा कारखाना मालकाच्या वादात; शहरातील दोनशे विडी कामगारांच्या रोजगारावर पुन्हा गडांतर


अहमदनगर (प्रतिनिधी)- जागा मालक व विडा कारखाना मालकाच्या वादात शहरातील दोनशे विडी कामगारांच्या रोजगारावर पुन्हा गडांतर आले आहे. पर्यायी व्यवस्था करुन भिकुसा यमासा क्षत्रीय विडी कारखान्यातील विडी कामगारांना पुर्ववत काम मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन, नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथ 3 डिसेंबर रोजी तेलीखुंट येथील विडी कारखान्यासमोर रास्ता रोको करण्याचा इशारा विडी कामगारांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने विडी कामगार महिलांनी एकत्र येऊन सदर मागणीचे निवेदन नायब तहसिलदार माधुरी आंधळे यांना दिले. यावेळी विडी कामगार नेते कॉ.शंकर न्यालपेल्ली, कॉ.सुभाष लांडे, कॉ.बन्सी सातपुते, शंकरराव मंगलारप, कॉ.सुधीर टोकेकर, व्यंकटेश बोगा, अंबादास दौंड, चंद्रकांत मुनगेल, कमलाबाई दोंता, उमा बोल्ली, सुवर्णा पासकंटी, जनाबाई आडेप, सुनिता आडेप, यमुना भगत आदिंसह शहरातील विडी कामगार महिला उपस्थित होत्या.

शहरातील तेलीखुंट भागात तेली समाज ट्रस्टची जागा असून, या जागेत भिकुसा यमासा क्षत्रीय विडी कारखाना चालतो. यामध्ये दोनशे विडी कामगार कार्यरत आहे. काही महिन्यांपासून जागा मालक असलेले तेली समाज ट्रस्ट व विडी कारखान्याचे मालक यांच्यात जागेवरुन वाद चालू आहे. यापुर्वी दि.15 ते 22 ऑक्टोबर पर्यंन्त विडी कारखाना बंद होता. नंतर संघटनेच्या पाठपुराव्यामुळे तोफखाना पोलीसांच्या मध्यस्थीने दि.15 नोव्हेंबर पर्यंन्त तोडगा काढण्याच्या निर्णयाने विडी कारखाना सुरु करण्यात आला होता. मात्र उभय पक्षात दि.15 नोव्हेंबर पर्यंन्त कुठलाही तोडगा न निघाल्याने पुन्हा विडी मालकाने दि.15 नोव्हेंबर पासून विडी कामगारांना काम देणे बंद केले आहे. यामुळे शहरातील दोनशे विडी कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. विडी कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने विडी मालकाने पर्यायी व्यवस्था करुन विडी कामगारांना काम देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.