Breaking News

तरुणाई ऑनलाईन मोबाईल गेमच्या आहारी


सातारा (प्रतिनिधी) : ऑनलाईन मोबाईल गेमने शहरासह ग्रामीण भागातील तरुणाई आहारी गेली आहे. पूर्वी मोबाईलवर ऑनलाईन कॅण्डी क्रश, पोकोमन हा गेम खेळला जायचा. हे गेम आताही खेळले जात असले तरी लुडो किंग हा गेम आल्याने कँडी क्रश, पोकोमनची क्रेझ कमी झाली. लुडो किंगवर जुगारही खेळला जातो. त्यातच आता पबजी या ऑनलाईन गेमने एन्ट्री केली. तरुणाईला याचे व्यसनच जडले आहे. पबजी हा गेम खूप भुरळ पाडणार असाच आहे. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, अनेक नोकरदार वर्ग फावल्या वेळात गेम खेळताना दिसत आहेत. काही मुले तर खाणेपिणे विसरून तासन्तास हा गेम खेळत बसतात. झोप विसरून रात्री उशिरापर्यंत हा गेम खेळला जात असल्याचे दिसून आले आहे. हल्ली मोबाईल डेटा अतिशय स्वस्तात उपलब्ध असल्याने गल्लोगल्ली मोबाईल आडवा धरून कानात हेडफोन घालून मुले, मुली आणि काही ज्येष्ठ मंडळीही हा गेम खेळताना दिसतात. परिणामी काही विद्यार्थी परीक्षेच्या कालावधीतही अभ्यासाकडे दुर्लक्ष करून गेम खेळत असल्याने चित्र पहावयास मिळत आहे. मुख्य म्हणजे हा गेम खेळता खेळता अनेकजण त्यात इतके गुंग होत आहेत की, आजूबाजूला काय घडत आहे, याचा अंदाज त्यांना येत नाही. मुलांची बिघडणारी मानसिकता आणि ढासळत्या आरोग्याला ऑनलाईन गेम कारणीभूत ठरतात. या गेममुळे परिसरातील मुलांचा हट्टीपणा वाढत चालला आहे. आकर्षक व्हिज्युअल्स, मारधाड आणि अ‍ॅक्शनमुळे हा गेम सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मुळात हा खेळ 18 वर्षावरील मुलांसाठीच आहे. पण त्यापेक्षा कमी वयाची मुलेही हा गेम जास्त खेळत आहे. या लहान मुलांमध्ये परिसरातील इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अधिक आहे. या मारधाडीच्या खेळामुळे मुलांमध्ये आक्रमक स्वभाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. अन्यथा मुलांना लवकरच मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारास नेण्याची वेळ येऊ लागली आहे.