Breaking News

डॉ.सादिक पटेल यांची गुणश्री प्राध्यापक पदावर नियुक्तीबुलडाणा,(प्रतिनिधी): बुलडाणा जिल्हयातील जळगांव जामोद तालुकयामधील पिंपळगाव काळे या गावापासून जवळच असलेल्या पळशी वैदय येथिल मूळचे रहिवासी असलेले डॉ.सादिक बापूमियाँ पटेल यांची महाराष्ट्र शासनाने नुकतेच गुणश्री प्राध्यापक या मानाच्या पदावर ग्रॅट मेडीकल कॉलेज व सर जे जे रुग्णालय मुंबई येथे नियुक्ती केली आहे. डॉ.पटेल हे ग्रॅट मेडीकल कॉलेज मुंबई येथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. गेल्या दहा वर्षानंतर गुणश्री प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आलेले डॉ.पटेल हे मानकरी आहेत. मानवसेवी वैद्यकिय अधिकारी म्हणून वैद्यकिय क्षेत्रात प्रशंसनिय कार्य केलेल्या तसेच वैद्यकिय क्षेत्रात आध्यापनाचे कार्य केलेल्या व्यक्तीस त्यांने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य शासना व्दारे अशा व्यक्तीची विशिष्ट महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या अध्यापन रुग्णालयामध्ये गुणश्री प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात येते. 

डॉ.सादिक पटेल यांनी मुंबई येथे ग्रॅट शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दिर्घकाळ अध्यापनाचे, संशोधनाचे, प्रशासकिय व रुग्णसेवेचे कार्य केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या काळात व्हाईस डीन (ग्रॅट मेडीकल कॉलेज व सर जे.जे. समुह रुग्णालय मुंबई) विशेष कार्य अधिकारी, संचालनालय वैद्यकिय शिक्षण मुंबई, महाराष्ट्र मेडिकल काँन्सीलचे प्रशासक, मेडीकल काँन्सील ऑफ इंडिया प्रतिनिधी आदी पदांवर कार्य केलेले आहे. त्यांनी अनेक शासकिय वैद्यकिय समित्यांवर कार्य केले असून महाराष्ट्र प्राध्यापक संघठनेचे सलग तीन वेळा अध्यक्षपद भुषविलेले आहे. त्यांना विदर्भरत्न, कोकाबे महाराष्ट्र या विशेष पुरस्कारासह अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक डॉक्टरांनी पीएचडी केलेली आहे. तसेच सामान्य परिवारातील व गरिब रुग्णांना त्यांनी सतत मदत केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयाने त्यांची गुणश्री प्राध्यापक पदावर नियुक्ती करुन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या निवडी बाबत महाराष्ट्रातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.