Breaking News

बाल आनंद मेळावे व्यावहारिक ज्ञानाची कार्यशाळा : काळे


कोपरगाव/प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळेमधून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर बाह्य जगातील ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सुरु असलेले सर्व उपक्रम विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे असून या उपक्रमातील बाल आनंद मेळावे ही व्यावहारिक ज्ञानाची कार्यशाळा असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी केले. 

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वारी गटाच्या शाळेचा बाल आनंद मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे होत्या.

या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, भाजीपाला, शालेयोपयोगी वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. आशुतोष काळे यांनी सर्व स्टॉलची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद व आत्मविश्‍वास पाहून त्यांनी खूप समाधान व्यक्त केले. बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी- विक्री व्यवहाराची माहिती व सखोल व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी मिळत असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे. यावेळी धोत्रे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी अर्जुन संजय शिंदे या विद्यार्थ्याची इस्त्रो सहलीसाठी बाल वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याबद्दल अर्जुन शिंदे व त्याचे वडील संजय शिंदे यांचा युवा नेते आशुतोष काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सभापती अनुसयाताई होन, जिल्हा परिषद सदस्या विमल आगवण, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कारभारी आगवण, प्रसाद साबळे, रोहिदास होन, गट शिक्षण अधिकारी शबाना शेख, केंद्र प्रमुख आर.के. ढेपले तसेच वारी गटातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.