Breaking News

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण थोडक्यात बचावले; बसला अपघात


नागपूर (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या बसला अपघात होता होता टळला. समोरून येणार्‍या डंपर चालकाने प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण थोडक्यात बचावले. जनसंघर्ष यात्रा बसमधून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक मोठे नेते प्रवास करत होते.

मोर्शीवरून चांदूरकडे जाताना रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्या वेळी अपघाताची घटना होता होता टळली. डंपर चालकाने वेळेत प्रसंगावधान ठेवत डंपर बाजूला घेतला आणि धडक टळली; मात्र त्यामुळे डंपर रस्त्याच्या कडेला मातीत रुतला. खानापूर गावाजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या एकच मार्गिकेचा वापर सुरू आहे. अरुंद रस्त्यावर काँग्रेस नेत्यांची मोठी बस आणि डंपर समोरासमोर आल्याने ही घटना घडली. या बसमध्ये काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते बसले होते. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी नेते होते.