Breaking News

हिवाळी पर्यटनासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी


पाटण, (प्रतिनिधी)
 महाराष्ट्रातील पर्यटनाचे सुरक्षित ठिकाण म्हणुन कोयनानगरचे नाव सर्वप्रथम पुढे येत असल्याने खर्‍या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी ऐन थंडीच्या दिवसांतही कोयनेत अक्षरश: झुंबड उडत आहे.


सह्याद्रीच्या कुशीतून वाहणारी कोयनामाई नदी, शिवसागर जलाशय, चारी बाजूंनी डोंगररांगा, हिरवीगार झाडी, पक्षांचा किलबिलाट, पहाटेच्यावेळी जलाशयातील पाण्यावर उतरलेले ढग, पहाटेची गुलाबी थंडी अशा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या काठी गावच्या परिसरात पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे. मुक्तहस्ताने उधळण केलेला येथील निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पाऊले जमिनीवरील स्वर्ग अर्थातच काठी गावाकडे वळू लागली आहेत. पर्यटकांच्या मनाला विरंगुळा प्राप्त करून देणारा निसर्गाचा खजिना म्हणजेच कोयनाकाठचा हिल स्टेशन परिसर होय. अशा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या काठी परिसराला पर्यटकांनी भेट दिली नाही तर नवलच म्हणावे लागेल.येथील सह्याद्री पर्वताच्या रांगांमधून वाकडे-तिकडे साद घालणारे कोयना धरण. शिवसागर जलाशयातील अथांग पसरलेले पाणी. काठी अवसरी हिल स्टेशनकडे जाताना सह्याद्री पर्वतावर पसरलेला आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्पाच्या पात्यांचा आवाज म्हणजे प्रत्यक्ष घोंघावणारा वारा येथे अनुभवता येतो. कोयना काठी हिलस्टेशनवरून शिवसागर जलाशयाबरोबर दिसणारा हिरवागार घनदाट जंगलातील निसर्गरम्य परिसरातील डोंगरामागे सायंकाळच्या वेळेला लपणारा सूर्य पाहताना स्वर्गाहूनही सुंदर ही भूमी वाटल्याशिवाय राहणार नाही. पर्यटकांसाठी त्यांचा येथील प्रत्येक क्षण सुखद आठवण ठरत आहे.