Breaking News

जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार धुरमुक्त तक्रार निवारण समितीच्या बैठकीत अमोल येडगे यांची माहिती


बीड, (प्रतिनिधी)- प्रत्येकांच्या घरात गॅस आला असला तरी अद्यापही अंगणवाडी ताईंना धुराचाच सामना करावा लागत होता. या संदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने अंगणवाडी धुरमुक्त व्हावी याची वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. यांची दाखल घेत गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तक्रार निवारण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी धुरमुक्त करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीला महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भगवान देशमुख उपमुख्यकार्यकरी अधिकारी (बा. क.) चंद्रशेखर केकान, महासंघाच्या जिल्हाध्यक्षा कमल बांगर, जिल्हा संघटक सचिन आंधळे, अंगणवाडी कार्यकर्ती कांता दिवे, राजिया दारुवाले, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव तिडके यांच्यासह सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची उपस्थिती होती. या बैठकीत बोलताना सीईओ अमोल येडगे म्हणाले की, प्रत्येक अंगणवाडी केंद्राला दोन गॅस सिलिंडर, एक शेगडी, चोदाव्या वित्त आयोगातून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ३००४ अंगणवाडी केंद्र असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून हा निधी केवळ अंगणवाडी साठीच खर्च करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. याच बरोबर डिजिटल अंगणवाडी करण्याचा संकल्पही असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. या बैठकीत मुख्यकार्यकारी अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांचे महासंघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अंगणवाडीचा निधी अंगणवाडीलाच खर्च करा : जिल्ह्यातील ३००४ अंगणवाडी केंद्रासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे हा निधी अंगणवाडी केंद्रावरच खर्च करण्याच्या सक्त सूचना सर्व गटविकास अधिकारी यांना सीईओ अमोल येडगेयांनी दिल्या.