Breaking News

काँग्रेस सर्वोच्च न्यायालयालाही ठरवत आहे खोटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका


रायबरेली : राफेल करारावरून देशभरातून सडकून टीका होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयही त्यांना खोटे वाटत असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. 

रायबरेलीमध्ये एक हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर मोदी यांनी जनसभेला संबोधित केले. सभेच्या सुरुवातीला विजय दिनानिमित्त मोदी यांच्याकडून सैनिकांना मानवंदना देण्यात आली. याच दिवशी 1971 मध्ये दहशतवाद, अत्याचार आणि आराजकतेविरूद्ध मोठे बंड पुकारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. रायबरेली-बांदा हा महामार्ग  झाला, तर चित्रकूट धामला जाण्यासाठी नागरिकांना ते सोयीचे होणार आहे. 
मोदी म्हणाले, की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार जे प्रयत्न करीत आहे, त्याबद्दल काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे. काँग्रेसकडून ही टीका का होत आहे, कारण त्यामध्ये क्वात्रोचा मामा आणि किश्‍चन मिशेल यांचे काका नसल्यानेच त्यांनी टीकेला सुरुवात केली आहे. काही लोकांना संरक्षण खाते, संरक्षण मंत्री आणि वायू दल यांच्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयही खोटे वाटत आहे. विरोधक कितीही खोटे बोलले तरी त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. देशात एका पक्षाचे सरकार आहे. हे सरकार सैनिकांची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे एक पक्ष सेनेचे मनोधैर्य कमी करण्याचे काम करत आहे. सैनिकांबाबत होणारे हे सगळे राजकारण देश बघत आहे. काँग्रेस आमच्या विरोधात उभे आहे, कारण त्यांना सैनिकांचे मनोधैर्य वाढवायचे नाहीे. विरोधी पक्षातून अशी काही वक्तव्ये केली जात आहेत, की त्याचे समर्थन पाकिस्तानात होत असल्याची टीका मोदी यांनी या कार्यक्रमात केली. 

कारगिल युद्धानंतर हवाई दलाकडून आधुनिक लढाऊ विमानांची मागणी करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस 10 वर्षे सत्तेत होती. काँग्रेस सत्तेत असूनही त्यांनी हवाई दलाला कमजोर करण्याचे काम केले, असा आरोप मोदी यांनी केला.