तहसील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; मोर्चाला सामोरे जाण्यासाठी एकही अधिकारी नाही


पाथर्डी (प्रतिनिधी)- शहरातील सार्वजनिक तसेच खासगी जागेवरील अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी पाथर्डीतील नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलिस, महसूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

शहरात तहसील कार्यालयासमोर, वसंतदादा विद्यालय ते जुने बस स्थानक तसेच शहरातून जाणार्‍या महामार्गालगत तसेच आंबेडकर चौकापासून शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कच्ची तसेच सिमेंटची पक्की अतिक्रमणे आहेत. टपर्‍या तसेच इमारती उभारण्यात आल्या; परंतु अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी असलेले महसूल, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ व आठवडाभरापासून नव्याने झालेल्या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या रस्त्यालगतच्या नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.

या वेळी तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी याच्यासह नगरपालिका मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. या वेळी येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी पेट्रोल टाकून तहसील कार्यालयाचा दरवाजा पेटविण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलीस उपनिरीक्षक परमेश्‍वर जावळे व हवालदार संजय आव्हाड तसेच इतर कर्मचार्‍यांनी बडे यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. मोर्चाची माहिती मिळताच शेवगाव परिक्षेत्राचे पोलिस उपाधीक्षक संदीप जवळे यांनी घटनास्थळी धाव घेत मोर्चाकर्‍यांना शांततेचे आवाहन केले. सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून अतिक्रमण हटवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्याने मोर्चेकर्‍यांनी नंतर उशिरा आंदोलन मागे घेतले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget