Breaking News

जेतेपदाचा दुष्काळ संपला


बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि उपविजेतेपद असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून झाले होते. अन्य स्पर्धातील विजेतेपद मिळायचे; परंतु राष्ट्रकुल, जागतिक बॅडमिंटन स्पर्धा, ऑलिपिंकमध्ये सिंधूवर दडपण यायचे. त्यातून ती सावरायचीच नाही. ऐनवेळी कच खाऊन तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागायचे. असे असले, तरी सिंधू हिची कामगिरी दुर्लक्षिण्यासारखी नक्कीच नाही. भारताला ऑलिंपिकमध्ये तिच्यामुळे तरी रौप्यपदक मिळाले. आता तिने ’वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पर्धेचे जेतेपद पटकावून ऐनवेळी आपण कच खातो, ही प्रतिमा बदलली. चीनमधील गुआंगझाऊ येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेचे जेतेपद पटकवणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे ही स्पर्धा आणि त्यातील तिची कामगिरी ही तिच्या शिरात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी आहे. अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर 21-19, 21-17 अशी मात केली. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांपूर्वी झालेल्या एका स्पर्धेत सिंधू ओकुहाराकडून पराभूत झाली होती. ओकुहारावर सिंधूचा हा पहिलाच विजय नसला, तरी तिला अनेकदा पराभूत व्हावे लागले, हे ही विसरता येणार नाही. गेल्यावर्षी या दोघींमध्येच अंतिम मुकाबला झाला होता. त्या वेळी सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सप्टेंबर 2017 पासून सिंधूने हाँगकाँग ओपन, वर्ल्ड टूर फायनल्स, इंडिया ओपन, कॉमनवेल्थ गेम्स, थायलंड ओपन, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. सुवर्णपदक तिला सातत्याने हुलकावणी देत होते. या पार्श्‍वभूमीवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सुवर्णपदकासह सिंधूने जेतपदांचा दुष्काळ संपविला. तिचा आत्मविश्‍वास वाढण्यासाठी हे विजेतेपद नक्कीच उपयोगी पडेल. बॅडमिंटनमध्ये सिंधूने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणार्‍या सिंधूला तेलंगणा सरकारने हैदराबादनजीक एक हजार चौरस यार्ड जमीन बक्षीस म्हणून दिली आहे. 2013 मध्ये सिंधूला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. 2015 मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2016 मध्ये क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च अशा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सिंधूची निवड झाली.

ऑलिम्पिक तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अशा बॅडमिंटन विश्‍वाचा मानबिंदू असलेल्या स्पर्धांमध्ये आणि मातब्बर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सिंधूची कामगिरी उंचावते.
आंध्र प्रदेश सरकारने सिंधूला उपजिल्हाधिकारी अर्थात क्लास वन दर्जाची नोकरी दिली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला क्रीडापटू आहे. सायना नेहवालनंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारी सिंधू केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू आहे. सिंधूनं मकाऊ स्पर्धेच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. सिंधूनं 2013, 2014 आणि 2015 मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. कोरिया सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत चेन्नई स्मॅशर्सने 94 हजार डॉलर्सची बोली लावत सिंधूला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. मलेशियाचा ली चोंग वेई आणि सायना नेहवाल यांच्यानंतरची सर्वाधिक बोली सिंधूसाठी होती. पी.व्ही.रामण्णा आणि पी.विजया या राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटूंची सिंधू ही कन्या. रामण्णा यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. घरातच खेळाचे वातावरण असल्याने तिला खेळाचे धडेही घरातूनच मिळाले. 1986 साली सेऊलमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकविजेत्या भारतीय संघाचा रामण्णा भाग होते. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत सिंधूच्या आईने तिच्या कारर्कीदीकडे लक्ष देण्यासाठी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तिच्या वैयक्तिक खेळाकडे लक्ष दिले. कुटुंबीयांचा त्याग आणि तिचे परिश्रम सार्थकी लागले. सिंधूची बहीण पी.व्ही. दिव्या राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू आहे. डॉक्टर होण्यासाठी तिने खेळाला सोडचिठ्ठी दिली. सिंधू हिच्या कुटुंबीयांची पार्श्‍वभूमी पाहिली, तर क्रीडा आणि त्याग या दोन गोष्टी हे या कुटुंबाचे वैशिष्ठ्य दिसते. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांची अकादमी हैदराबादनजीकच्या गच्चीबाऊली परिसरात आहे. अकादमीच्या ठिकाणापासून सिंधूचे घर दीड तासाच्या अंतरावर होते. प्रशिक्षण, शाळा, पुन्हा प्रशिक्षण यामध्ये सिंधूची ओढाताण होत असे. खेळाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी गोपीचंद यांनी सिंधूच्या पालकांना अकादमीजवळ राहायला येण्याचा सल्ला दिला. हा सल्ला सिंधूच्या पालकांनी मानला. सहाव्या वर्षापासून रॅकेट हाती घेतलेल्या सिंधूच्या कारकीर्दीसाठी हा निर्णय कलाटणी देणारा ठरला.
पाच फूट आणि अकरा इंच अशा उंचीचे वरदान लाभलेल्या सिंधूच्या खेळातील तंत्रकौशल्यावर गोपीचंद यांनी प्रचंड मेहनत घेतली. कारकीर्दीत सुरुवातीला सामन्यादरम्यान मोक्याच्या क्षणी सिंधू एकाग्रता भंग पावत असे. प्रशिक्षकांच्या मदतीने सिंधूने या मुद्यावर लक्ष देत खेळात सुधारणा केली. आताही तिने जपानच्या नोझोमी ओकुहारावर जबरदस्त मात करत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिंधूने ओकुहारावर 21-19,21-17 अशी मात करत या किताबावर आपले नाव कोरले. महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या रॅचनोक इन्टॅननवर 21-16, 25-23 अशी मात करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. आज तिची द्वितीय मानांकित ओकुहाराशी लढत झाली. यापूर्वी तब्बल बारा वेळा आमनेसामने आलेल्या या दोघींनी प्रत्येकी सहा वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे या दोघींच्या आजच्या लढतीकडे संपूर्ण बॅडमिंटन जगताचे लक्ष लागले होते; पण कोणत्याही दबावाखाली न येता सिंधूने नैसर्गिक खेळाचे दर्शन घडवत ओकुहारावर मात केली. सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ओकुहारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सामन्याचा पहिला पॉइंट ओकुहाराने जिंकला असला, तरी सिंधूने सामन्यात पुनरागमन करताना अप्रतिम स्मॅश लगावत पॉइंटसची लयलूट केली. सिंधूने 5-1 ने आघाडी घेतल्यानंतर ओकुहारानेही चांगला खेळ करत 7-5 ने हे अंतर कमी केले; मात्र त्यानंतर सिंधूने कोर्ट कव्हर करत ओकुहाराला काही चुका करण्यास भाग पाडले. त्यामुळे ब्रेकपर्यंत सिंधूने 11-6 ची आघाडी घेतली होती. 
ब्रेकनंतरही सिंधूने चांगला खेळ करत ओकुहारावर 14-6 ने आघाडी घेतली. त्यामुळे सिंधू हा सामना लीलया जिंकणार असल्याचे वाटत असतानाच ओकुहाराने डावपेचात बदल केला. ओकुहाराने रणनीती बदलत चांगले कोर्ट कव्हर केले. त्यामुळे एकवेळ अशी आली, की सिंधूला पॉइंट मिळवण्यासाठी झगडावे लागले. रणनीती बदलल्याचा फायदा उठवणार्‍या ओकुहाराने सामना 16-16 असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याची उत्कंठा अधिकच वाढली. त्यानंतर सिंधूने अत्यंत सावध खेळी करत 20-17 ने आघाडी घेतली खरी; पण त्यानंतर ओकुहारानेही दोन पॉइंट खिशात घातल्याने सामना अधिक रोमांचक झाला; परंतु सिंधूने पुन्हा एकदा संयमी आणि आक्रमक खेळीचे दर्शन घडवत पहिला गेम 21-19 ने जिंकला. दुसर्‍या गेमच्या सुरुवातीलाच 3 पॉइंटस मिळवून सिंधूने सामन्यावर दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र ओकुहारानेही कडवी झुंज देत सामन्यातील आपले आव्हान संपुष्टात आले नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ब्रेकपर्यंत 11-9 ची आघाडी घेतलेल्या सिंधूने दुसरा गेमही 18-16 च्या फरकाने जिंकून वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारतासाठी ही मोलाची कामगिरी आहे.